खरेदीची संधी! सोनं-चांदीचे दर घसरले, जाणून घ्या आजचे भाव…


नवी दिल्ली : इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील तणावपूर्ण संघर्षाला महिनाभर उलटूनही अद्याप कोणताही तोडगा निघालेला नाही. या वाढत्या युद्धजन्य परिस्थितीचा जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होत असून, विशेषतः आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अस्थिरता निर्माण झाली आहे.

कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती वाढत असतानाच, गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षित गुंतवणूक मानल्या जाणाऱ्या सोने आणि चांदीच्या किमतींमध्येही अनपेक्षित घसरण पाहायला मिळत आहे.

जागतिक घडामोडींमुळे बाजारात मोठी उलथापालथ सुरू असून, पुढील काळात या संघर्षाचा परिणाम आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या अवघ्या दोन दिवसांत सोन्याच्या दरात लक्षणीय घसरण पाहायला मिळाली आहे. २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅममागे तब्बल २८० रुपयांनी स्वस्त झाले असून, २२ कॅरेट सोन्याच्या दरातही २६० रुपयांची घट नोंदवली गेली आहे.

विशेष म्हणजे, याच वर्षात सोन्याने प्रति १० ग्रॅम २ लाख २ हजार ९८४ रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठत बाजाराला चकित केले होते. मात्र, त्या ऐतिहासिक पातळीवरून आता दर सातत्याने घसरताना दिसत आहेत आणि सध्या सोने सुमारे १.५० लाखांच्या आसपास स्थिरावले आहे.

याचा अर्थ असा की, उच्चांकी दराच्या तुलनेत सोनं जवळपास ५२ हजार रुपयांनी स्वस्त झालं आहे. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी ही खरेदीची चांगली संधी मानली जात असली, तरी गुंतवणूकदारांमध्ये मात्र या घसरणीमुळे चिंता वाढताना दिसत आहे.

भारतातील प्रमुख महानगरांमध्ये सोन्याचे दर शुद्धतेनुसार वेगवेगळे पाहायला मिळत आहेत.

राजधानी दिल्ली येथे १० ग्रॅमसाठी २४ कॅरेट सोन्याचा दर १,५०,८०० रुपये असून, २२ कॅरेटसाठी १,३८,२४० रुपये आणि १८ कॅरेटसाठी १,१३,१३० रुपये मोजावे लागत आहेत.

तर देशाची आर्थिक राजधानी मुंबई मध्ये हेच दर किंचित कमी आहेत. येथे २४ कॅरेट सोने १,५०,६५० रुपये, २२ कॅरेट १,३८,०९० रुपये आणि १८ कॅरेट १,१२,९८० रुपये प्रति १० ग्रॅम दराने उपलब्ध आहे. महानगरांमध्ये दरांतील हा छोटासा फरक स्थानिक कर, मागणी-पुरवठा आणि बाजारातील परिस्थितीवर अवलंबून असल्याचे जाणकार सांगतात.

चांदीच्या किमतींबाबत पाहिले तर, सलग चार दिवस स्थिर राहिल्यानंतर आता दरात घसरण सुरू झाली आहे. राजधानी दिल्ली येथे चांदीच्या दरात प्रति किलो १०० रुपयांची घट नोंदवली गेली आहे.

सध्या दिल्ली, मुंबई आणि कोलकाता या प्रमुख शहरांमध्ये एक किलो चांदीचा भाव २,४९,९०० रुपयांवर पोहोचला आहे. मात्र, दक्षिण भारतातील चेन्नई येथे चांदीचे दर या शहरांच्या तुलनेत अधिक आहेत. चेन्नईमध्ये एक किलो चांदीसाठी २,६०,१०० रुपये मोजावे लागत असून, त्यामुळे सध्या देशात सर्वाधिक महाग चांदी चेन्नईत असल्याचे स्पष्ट होत आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!