व्यापारी सायबर फसवणुकीचा बळी, अंदमान टूरचे स्वप्न दाखवून भामट्यांनी घातला 6 लाखांचा गंडा

लोणी काळभोर : बनावट ट्रॅव्हल एजन्सीच्या नावाखाली अंदमान-निकोबार सहलीचे आमिष दाखवत हवेली तालुक्यातील लोणी काळभोर येथील एका व्यापाऱ्याची तब्बल 6 लाख 6 हजार 400 रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी अज्ञात सायबर चोरट्यांच्या विरुद्ध लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, राहुल उत्तम काळभोर (वय 45 , रा. वाकवस्ती , लोणी काळभोर) असे फसणवुक झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. राहुल काळभोर हे महिलांच्या साहित्याचे दुकान चालवतात. आपल्या मित्रांसह अंदमान-निकोबार येथील सहलीचे नियोजन करत असताना त्यांनी गुगलवर ट्रॅव्हल एजन्सींचा शोध घेतला. यावेळी त्यांना “Big Goal Travel” या नावाची वेबसाईट आणि सोशल मीडियावरील माहिती मिळाली. अमर वर्मा नावाच्या व्यक्तीने मोबाईल व व्हॉट्सअॅपद्वारे काळभोर यांच्याशी संपर्क साधून फ्लाइट व हॉटेल बुकिंग करण्याचे आश्वासन दिले.
विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी संबंधिताने कंपनीचे लायसन्स, जीएसटी क्रमांक तसेच इंस्टाग्राम अकाउंटची माहिती पाठवली. कागदपत्रे व ऑनलाईन उपस्थिती पाहून फिर्यादी व त्यांच्या मित्रांचा विश्वास बसला. आरोपींनी दिलेल्या सूचनांनुसार 2 मार्च ते 18 मार्च 2026 या कालावधीत काळभोर यांनी युनियन बँक व एचडीएफसी बँकेतील वेगवेगळ्या खात्यांमधून पैसे ट्रान्सफर केले. विमान व हॉटेल बुकिंगच्या नावाखाली एकूण 6 लाख 6 हजार 400 रुपये आरोपींच्या खात्यांमध्ये जमा करण्यात आले.

सुरुवातीला आरोपींकडून पुणे ते श्री विजयपुरम (अंदमान) या प्रवासासाठी फ्लाइटचा पीएनआर क्रमांक आणि हॉटेल बुकिंगची माहिती पाठवण्यात आली. परंतु परतीच्या प्रवासाची माहिती देण्यास ते टाळाटाळ करू लागले. संशय आल्याने काळभोर यांनी संबंधित फ्लाइटची तपासणी केली असता ती बुकिंग रद्द झाल्याचे समोर आले. तसेच हॉटेलशी संपर्क साधल्यावर बुकिंग झाले असले तरी पेमेंट न झाल्याचे स्पष्ट झाले. आरोपींनी विविध कारणे देत वेळकाढूपणा सुरू केला आणि अखेर संपर्कच तोडला.
अखेर काळभोर यांना आपली ऑनलाईन फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी सायबर पोर्टलवर तक्रार नोंदवली. त्यानुसार लोणी काळभोर पोलिस ठाण्यात मोबाईल नंबर, व्हॉट्सअॅप अकाउंट, वेबसाईट लिंक व संबंधित बँक खात्यांच्या आधारे आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.