बारामतीत नियमभंग करणाऱ्या बस वाहनांना दणका! तब्बल 15 वाहनावर कारवाई,67 हजार 500 रुपयांचा दंड वसूल..

बारामती : बारामतीतील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने बारामती दौंड आणि इंदापूर तालुक्यात शालेय बस विशेष तपासणी मोहीम राबवण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत एकूण 77 शालेय बसेसची तपासणी करण्यात आली. या तपासणीतून नियमांचं उल्लंघन करणाऱ्या तब्बल 15 वाहनांवर कारवाई करण्यात आली असून संबंधित वाहनांकडून एकूण 67 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून विद्यार्थ्यांचे पालक व नागरिकांकडून वारणा येणाऱ्या तक्रारी आणि मागण्यांचा विचार करून ही मोहीम राबवण्यात आली आहे.बारामती, दौंड आणि इंदापूर तालुक्यातील एकूण 77 शालेय वाहनांची तपासणी करण्यात आली.तपासणीदरम्यान अनेक बसांकडे आवश्यक कागदपत्रांची कमतरता आढळून आली. काही वाहनांकडे योग्यता प्रमाणपत्र, विमा प्रमाणपत्र, प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र मुदत संपलेली होती, तर काही ठिकाणी शालेय बस नियमावलीचे पालन न केल्याचे निदर्शनास आले. रस्ते सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्या वाहनांवरही दंडात्मक कारवाई करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या परीक्षा संपल्यानंतर ही कार्यालयाकडून ही विशेष तपासणी मोहीम सातत्याने सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे. सर्व शालेय बस चालक, मालक व इतर वाहनधारकांनी आपल्या वाहनांची कागदपत्रे अद्यावत ठेवून नियमांचे पालन करावे, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम यांनी केले आहे.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. तसेच मोटर वाहन निरीक्षकांनी संबंधित शाळांना भेटी देत शालेय बस नियमावलीचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देखील देण्यात आले आहेत. विधिग्राह्य नसलेली अथवा मुदत संपलेली कागदपत्रे तात्काळ नुतनीकरण करण्याबाबत शाळा व्यवस्थापकांना बजावण्यात आले आहे.
बस चालक व परिचालकांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेला प्राधान्य देत वाहतूक नियमांचे पालन करा व वेग मर्यादा पाळावी आणि बसमध्ये आवश्यक सुरक्षा साधनसामग्री उपलब्ध ठेवावी असे निर्देश देखील कार्यालयाकडून देण्यात आले आहेत