आंध्र प्रदेशच्या पलनाडूत बसचा लॉरीशी भीषण अपघात ! बस पेटून ६ जणांचा अंत ..!!
पालनाडू : आंध्र प्रदेशच्या पालनाडू जिल्ह्यात चिन्नागंजम येथून हैदराबादला जाणा-या बसची टिप्पर लॉरीला धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातानंतर बस आणि लॉरीला आग लागल्याने ६ जणांचा होरपळून मृत्यू झाला.
या अपघातातील जखमींवर चिलाकालुरीपेट शहरातील सरकारी रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी गुंटूरला पाठवण्यात आल्याची माहिती चिलकलुरीपेटा ग्रामीण पोलिसांनी दिली आहे. पालनाडू जिल्ह्यातील चिलाकालुरीपेट मंडल येथे हा अपघात झाला.
अंजी (३५), उप्पगुंडुर काशी (६५), उपगुंडूर लक्ष्मी (५५) आणि मुप्पाराजू ख्याती सैश्री (८, सर्व रा. बापतला, आंध्र प्रदेश) अशी मृतांची नावे आहेत. अन्य दोन मृतांची ओळख पटवली जात असल्याचे सांगण्यात आले आहे.
जखमी लोकांनी सांगितले की ते मतदान केल्यानंतर एकूण ४२ लोक बसमधून प्रवास करत होते. त्यापैकी एक लॉरी ड्रायव्हर, एक बस ड्रायव्हर आणि इतर चार जणांचा जागीच मृत्यू झाला असे चिलाकालुरिपेटा ग्रामीण पोलिस स्थानकातील अधिका-याने सांगितले. या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
बापतला जिल्ह्यातील चिन्नागंजम या मंडळातून बस हैदराबादला जात होती. यादरम्यान बस लॉरीला धडकली. या अपघातात दोन्ही वाहनांचे पूर्णपणे नुकसान झाले. बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे, असे पोलिसांनी सांगितले .