बुलढाण्यातील पेपरफुटीप्रकरणात आणखी दोन शिक्षकांना अटक…!
बुलढाणा : बोर्डाच्या खबरदारीनंतरही पहिल्याच दिवसापासून परीक्षेपूर्वी पेपर व्हायरल होण्याचे प्रकरण समोर येत आहेत. एकीकडे शिक्षण मंडळ कॉपीमुक्त परीक्षा व्हाव्यात यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करत आहे. बैठे पथक, भरारी पथक यासह पोलिसांची पथके परीक्षा केंद्राबाहेर तैनात करण्यात आली आहेत. तर दुसरीकडे मात्र थेट परीक्षा केंद्रावरील पेपर फुटल्याची प्रकरणे समोर येत आहे.
सध्या महाराष्ट्रात राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येत असलेल्या दहावी व बारावीच्या परीक्षा सुरु आहेत. याचदरम्यान, बारावी पेपरफुटी प्रकरणी पोलिसांनी अजून दोघांना ताब्यात घेतलं असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही बुलढाण्यातील लोणार तालुक्यातील खाजगी शाळेवरील शिक्षक असल्याची माहिती समोर आली आहे. पेपरफुटी प्रकरणात याआधी देखील काही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. आणि आता देखील दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. आता आरोपींची संख्या सातवर पोहचली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कॉपी प्रकरणात शकील शे. मुनाफ (रा.लोणार) आणि अंकुश पृथ्वीराज चव्हाण (रा. सावरगाव-तेली, ता. लोणार) अशी ताब्यात घेतलेल्या दोन शिक्षकांची नावे आहेत.