ब्रेकिंग! पार्थ पवारांनी घेतली राज्यसभा खासदारकीची शपथ, पेहरावानं वेधल लक्ष, अजितदादांच्या आठवणीने कार्यकर्त्यांचे डोळे पाणावले..

पुणे: महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आता त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार पक्षाची धुरा सांभाळत आहेत. त्यानंतर आता आज त्यांचे सुपुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तरुण नेते पार्थ पवार यांनी आज नवी दिल्लीत राज्यसभा खासदार म्हणून शपथ घेतली. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती सी. पी. राधाकृष्णन यांनी त्यांना पदाची आणि गोपनीयतेची शपथ दिली.

राजधानी दिल्लीत पार्थ पवार यांनी खासदारकीची शपथ घेतलेली अधिक लक्षवेधी ठरली. याचं कारण विशेष म्हणजे यावेळी पार्थ पवारांनी अजितदादांची खास ओळख असलेले ‘गुलाबी जॅकेट’ परिधान केले होते. अगदी तोच आवाज आणि त्याच जॅकेट नी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी कार्यकर्त्यांचे अजितदादांच्या आठवणीने डोळे पाणावले.केवळ पेहरावच नाही, तर पार्थ पवारांची देहबोली आणि आवाजातही काही प्रमाणात अजितदादांची छटा जाणवत असल्याची चर्चा यावेळी रंगली.
अजित पवार यांच्या निधनानंतर पवार कुटुंबावर आणि पक्षावर मोठी जबाबदारी आली आहे. अशा वेळी पार्थ पवारांची ही नवी सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेससाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. महाराष्ट्रातील इतर खासदारांचा शपथविधी आधीच पार पडला होता, मात्र पार्थ पवारांच्या शपथविधीबाबत सस्पेन्स कायम होता. पार्थ पवार यांनी आज राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली.

या सोहळ्याला महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्यासह जे. पी. नड्डा आणि जयराम रमेश यांसारख्या दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती.