ब्रेकिंग! एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी तब्बल 5 तास बैठक, रविंद्र चव्हाणांसोबत नेमकी कशावर चर्चा?

पुणे:आगामी महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असताना शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी रात्री उशिरा तब्बल पाच तास बैठक पार पडली. या बैठकीत महायुतीने महत्त्वाचे निर्णय घेतले असल्याची माहिती समोर आली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यात जवळपास ५ तास बैठक झाली. या बैठकीत शिंदे गटाचे नेतेही उपस्थित होते. या बैठकीत महायुतीतील जागावाटपाचा बहुचर्चित फॉर्म्युला अखेर निश्चित झाला आहे. त्याची अधिकृत घोषणा लवकरच होणार आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील महत्त्वाच्या महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपमधील जागावाटपाचा निर्णय अंतिम टप्प्यात पोहोचला आहे
या बैठकीत मुंबई महानगर क्षेत्रातील ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर आणि वसई-विरार महापालिकांमधील शिवसेना-भाजप युतीच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब करण्यात आले. दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याने महायुतीतील तिढा सुटला असल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यातील महापालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. मुंबईसह ठाणे, पुणे, नाशिक, मीरा-भाईंदर आदी महापालिकांमध्ये ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याचे निश्चित झाल्यानंतर दुसरीकडे महायुतीच्या गोटात मोठ्या घडामोडी झाल्या आहेत.