ब्रेकिंग! संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड वाल्मीक कराडच्या अडचणी वाढणार, ‘त्या’ प्रकरणात निकटवर्तीयांची चौकशी होणार?

पुणे : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टरमाईंड आरोपी वाल्मिक कराड याच्या अडचणीत आता आणखीन वाढ होणार आहे.आता महादेव मुंडे खून प्रकरणात वाल्मीक कराड हाच मुख्य आरोपी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी त्यांच्या निकटवर्तीयांची नार्को आणि एकाची ब्रेन मॅपिंग चाचणी होणार आहे. यामुळे आता वाल्मीक कराडच्या भोवतीचा फास आणखीन आवळणार आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, बीडच्या परळी येथील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. आयपीएस पंकज कुमावत यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीने आता वैज्ञानिक चाचण्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. आज मुंबईच्या न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेत वाल्मीक कराड यांच्या घरी कामाला असलेले दोघे आणि तिसरा त्यांचा मित्र यांची नार्को टेस्ट तर एकाची ब्रेन मॅपिंग चाचणी होणार आहे. या चाचण्यांचे अहवाल प्राप्त झाल्यानंतरच हत्येचे नेमके कारण आणि मारेकऱ्यांचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बीडच्या महादेव मुंडे खून प्रकरणात एसआयटी आता या नावांचा संबंध कराड यांच्याशी जोडून त्यादृष्टीने तपासाची चक्रे फिरवत आहे. मात्र, कराड कुटुंबाने या लोकांशी कोणताही संबंध नसल्याचा दावा यापूर्वीच केला आहे. तपासात तांत्रिक पुरावे मिळत नसल्याने एसआयटीने वैज्ञानिक चाचण्यांचा आधार घेतला आहे. त्यामुळे आता या चाचण्याच्यां अहवालातून काय माहिती पुढे येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान 20 ऑक्टोबर 2023 रोजी महादेव मुंडे यांची परळीतील तहसील कार्यालयासमोर हत्या करण्यात आली होती. मात्र 2023 पासून या प्रकरणात कोणालाही अटक करण्यात आली नव्हती. आता या प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. आतापर्यंत या सहा महिन्यात 200 लोकांची कसून चौकशी केली आहे यासाठी 500 पेक्षा अधिक लोकांची कॉल डिटेल तपासणी करण्यात आली आहे
महादेव मुंडे हे पिग्मी एजंट असल्याने प्रामुख्याने पैशांच्या व्यवहारातून ही हत्या झाली का, यादृष्टीने सखोल तपास सुरू आहे. यासह प्लॉटिंगचे व्यवहार, वैयक्तिक वाद आणि कौटुंबिक बाबी अशा सर्व बाजूंनी तपासाची चक्रे फिरली आहेत. याबाबत आता आणखीन काय उलगडा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.