ब्रेकिंग! शरद पवारांना टक्कर देण्यासाठी एकनाथ शिंदे मैदानात ; राज्यसभा निवडणुकीत दुसरा उमेदवार देणार ?

मुंबई: राज्यसभेच्या सातव्या जागेसाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना रिंगणात उतरण्याची तयारी पूर्ण झाली असताना आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा डाव टाकला आहे. त्यामुळे शरद पवार यांच्यावर टांगती तलवार असण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडी आणि थेट शरद पवार यांच्या गटाला थेट आव्हान देण्याची तयारी पूर्ण केली आहे. राज्यसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने आपला दुसरा उमेदवार मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतल्याने आता ही निवडणूक बिनविरोध होण्याचे सर्व मार्ग बंद झाले असून चुरशीने ही निवडणूक होणार आहे.
शिवसेना शिंदे गटाने आता राज्यसभा निवडणुकीत दोन उमेदवार दिल्यास राज्यातील 7 जागांसाठी 8 उमेदवार असणार आहेत. त्यामुळे निवडणूक बिनविरोध न होता निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. आमदारांच्या संख्याबळानुसार भाजपचे 4, शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांचा प्रत्येकी 1 आणि महाविकास आघाडीचा एक उमेदवार विजयी होऊ शकतो. मात्र आता या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला टक्कर देण्यासाठी शिंदे गट मैदानात उतरला आहे.

या राज्यसभा निवडणुकीत शिंदे गटाने दुसरा उमेदवार उभा केल्यास शरद पवार कशी खेळी करणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. आता प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी कोण कोणाला साथ देणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.