ब्रेकिंग! एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढल्या; सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?

पुणे : पुण्यातील भोसरी एमआयडीसीतील जमीन घोटाळा प्रकरणी चर्चेत आलेले राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर आता जळगावच्या सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती समोर आली आहे.त्यामुळे आता खडसे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. पोलिसांना शिवीगाळ आणि दमदाटी केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, सावदा पोलीस स्टेशनमध्ये एका गौण खनिज चोरीच्या प्रकरणात पोलिसांना जाब विचारताना एकनाथ खडसेंनी अर्वाच्च शब्दात सहाय्यक पोलीस निरीक्षकांना अरेरावी केल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे शासकीय कामात अडथळा आणि अपमानास्पद वागणूक दिल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे या संदर्भात फोनवरून माहिती देताना एकनाथ खडसेंकडून त्यांच्याविरोधात तक्रारीत केलेल्या आरोपांचे खंडन करण्यात आले आहे.
नुकताच पुण्यातील भोसरी एमआयडीसीतील जमीन घोटाळा प्रकरणात एकनाथ खडसे यांना मोठा दिलासा मिळाला होता.त्यांच्या विरोधातील अजामीन पत्र वॉरंट रद्द करण्यात आले होते.अशामध्ये आता त्यांच्या विरोधात जळगावच्या सावदा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक तसेच गृहमंत्री यांच्याबद्दल अर्वाच्य भाषा वापरत अरेरावी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

मात्र दुसरीकडे एकनाथ खडसे यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. तें म्हणाले,गौण खनिज प्रकरणात चौकशीसाठी सावदा पोलीस स्टेशनमध्ये गेलो, मात्र त्यावेळी माझ्याकडून एक चुकीचा शब्द निघाल्याने पोलीस निरीक्षकाची आपण माफी मागितल्याची माहिती एकनाथ खडसे यांनी फोनद्वारे दिली आहे.