ब्रेकिंग! भाजपने भाकरी फिरवली ; नितीन नबीन यांची भाजपच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड

पुणे :गेल्या अनेक महिन्यापासून लांबणीवर असलेल्या भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या निवडीचा सस्पेन्स अखेर संपला आहे.भारतीय जनता पक्षाने आज राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षांच्या नावाची घोषणा केली. बिहार सरकारमधील मंत्री नितीन नबीन यांना पक्षाने मोठी जबाबदारी दिली. नबीन यांच्याकडे नेतृत्व दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
नितीन नबीन हे सध्या बिहारच्या नितीश कुमार यांच्या सरकारमध्ये मंत्री आहेत. भाजपाने आता त्यांच्यावर राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली आहे. आता ते जे.पी.नड्डा यांची जागा सांभाळतील. भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी त्यांच्या नियुक्तीविषयी माहिती दिली. अरुण सिंह यांनी पत्रकात म्हटलं की, ‘भाजपच्या संसदीय बोर्डाने बिहार सरकारमघील मंत्री नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. त्यांची नेमणूक तातडीने करण्यात आली आहे’.
नितीन नबीन हे बिहार विधानसभेतील बांकीपुर मतदारसंघाचे आमदार आहेत. त्यांनी विद्यार्थी राजकारणापासून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली असून भाजपमध्ये विविध संघटनात्मक पदावर त्यांनी काम केल आहे.२००६ साली झालेल्या पोटनिवडणुकीत जिंकल्यानंतर चार वेळा आमदार म्हणून निवडून आले. २०१०,२०१५,२०२० आणि २०२५ साली झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत त्यांनी विजय मिळवला आहे.

पटनामध्ये जन्म घेतलेले नितीन नबीन हे भाजपचे वरिष्ठ नेते नवीन किशोर प्रसाद यांचे पूत्र आहेत. नितीन नबीन सिन्हा हे कायस्थ समाजातून येतात. ते भाजयुमो राष्ट्रीय महासचिव देखील होते. ते बिहार सरकारमध्ये मंत्री व्यतिरिक्त छत्तीसगडचे प्रभारी आहेत.

मागील महिन्यात झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत नितीन नबीन यांनी आरजेडीच्या रेखा कुमारी यांचा पराभव केला. बांकीपूर विधानसभा मतदारसंघात नितीन यांना ९८२९९ मते मिळाली. तर आरजेडी उमेदवार रेखा कुमार यांना ४६३०८ मते मिळाली. याआधी २०२० साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत नबीन यांनी शत्रुघ्न सिन्हा यांचे पूत्र लव सिन्हा यांचा पराभव केला होता.तत्पूर्वी, आज रविवारीच भाजपने उत्तर प्रदेश प्रदेशाध्यपदाच्या नावाचीही घोषणा केली.
