गिफ्ट हवंय ना? चल मग डोळ्यांवर पट्टी बांध…म्हणत माथेफिरू प्रियकराने प्रेयसीचा चाकूने गळा चिरला…!
अमरावती : चल, गिफ्ट हवंय ना? आणले आहे. मात्र, त्यासाठी डोळे बंद कर, पट्टी बांध अन् ओळख गिफ्ट ते काय, असे म्हणत एका माथेफिरू प्रियकराने प्रेयसीचा चाकूने गळा चिरला. ती जिवाच्या आकांताने खोलीतून बाहेर पडली, तर इकडे त्याने देखील स्वत:वर वार करत आत्महत्येचा प्रयत्न परतवाड्यातील केला. एका लॉजमध्ये सोमवारी दुपारी हा रक्तरंजित थरार घडला. त्या प्रेमीयुगुलाला रुग्णालयात हलविण्यात आले असून, त्या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संकेत दिनेश मांडवकर (२२, रा. आमनेर, ता. वरुड) असे त्या प्रियकराचे नाव आहे. जखमी १९ वर्षीय युवती ही अंजनगाव सुर्जी तालुक्यातील मूळ रहिवासी आहे. काही वर्षांपूर्वी सोशल मीडियावरून दोघांचे प्रेमसूत जुळले.
त्यांच्या प्रेमात तिसरा आल्याची कुणकुण संकेतला लागली. त्याने तिला सोमवारी अमरावतीहून परतवाड्याला बोलावून घेतले. लॉजमध्ये तिच्या डोळ्यांवर त्याने पट्टी बांधली आणि चाकूने तिच्यावर सपासप वार केले. ती झटका देत बाहेर पळाली.
आरोपी संकेत हा अचलपूर येथे वर्षभरापासून महावितरण कंपनीत अॅप्रेंटिसशिप करत होता. तर त्याची प्रेयसी अमरावती येथील एका विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. १९ मार्चला संकेतचा वाढदिवस होता. मात्र, वाढदिवशी दोघांची भेट झाली नाही म्हणून ती आली. तिने संकेतसाठी शर्ट, तर त्याने तिच्यासाठी अंगठी भेट म्हणून आणली होती.