अखेर काका-पुतणे एकत्र! दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची युती, एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, जागावाटपाचा आकडा काय?

पुणे : राज्यातील महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने राजकीय पक्षांच्या अनेक तऱ्हा सर्वसामान्य नागरिकांना पाहायला मिळत आहेत. तर, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात नाट्यमय घडामोडी घडत आहेत.
सुरुवातीला या निवडणुकीसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा सुरु होती. मात्र, ही चर्चा फिस्कटल्याची माहिती समोर आली होती. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी (२८ डिसेंबर २०२५) मोठी घोषणा केली आहे. अजित पवार आणि शरद पवार गट पुण्यात एकत्र येऊन निवडणूक लढवणार आहेत.
तर दुसरीकडे पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र निवडणूक लढवणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. परिवार पुन्हा एकत्र येत आहे, असे भावनिक विधान करत त्यांनी या युतीवर शिक्कामोर्तब केले.

गेल्या काही काळापासून एकमेकांविरुद्ध उभे ठाकलेले अजित पवार आणि शरद पवार यांचे गट आता आगामी निवडणुकांसाठी एकत्र आल्याचे पाहायला मिळत आहे. या दोन्ही गटांमध्ये जागावाटप ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट १२५ जागांवर निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे.

तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट ४० जागांवर निवडणूक लढवणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या संदर्भात आज दुपारी एक महत्त्वाची पत्रकार परिषद होणार आहे. त्यामध्ये युतीची अधिकृत घोषणा आणि पुढील रणनीती स्पष्ट केली जाणार आहे.
पिंपरी-चिंचवडसाठी जागावाटपाची अंतिम यादी येत्या दोन दिवसांत जाहीर केली जाणार आहे. आता तळवडे येथील निवडणूक प्रचार सभेत अजित पवारांनी भाष्य केले. पिंपरी-चिंचवडच्या विकासासाठी आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी काही वेळा कठोर पण आवश्यक निर्णय घ्यावे लागतात, असेही अजित पवारांनी नमूद केले.
अजित पवार यांनी सर्व उमेदवारांनी घड्याळ चिन्हावर लढावे असा आग्रह धरला होता, ज्याला शरद पवार गटाने विरोध केला होता. मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार अजित पवार गट घड्याळ चिन्हावर लढणार असल्याची माहिती समोर आली आहे. तर शरद पवार गट तुतारी चिन्हावर निवडणूक लढणार असल्याचे बोललं जात आहे. अशा प्रकारे दोन्ही पक्ष आपापल्या चिन्हासह पण युतीमध्ये निवडणूक लढवतील.
