दोन्ही उमेदवारांना समान मते, मग चिमुकल्याने चिठ्ठी काढली अन् भाजपला धक्का बसला, पुण्यात नेमकं काय घडलं?


पुणे : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या मंचर नगरपंचायतीची पहिलीच निवडणूक ऐतिहासिक ठरली आहे. कारण निवडणुकीत प्रभाग क्रमांक ३ मध्ये लोकशाहीचा असा काही चमत्कार पाहायला मिळाला की प्रशासनापासून मतदारांपर्यंत सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

दरम्यान, एका-एका मतासाठी उमेदवार जिवाचे रान करत असताना, येथे चक्क दोन प्रमुख उमेदवारांना मतदारांनी समसमान पसंती दिली. पण अखेर एका चिठ्ठीने नव्या नगरसेवकाची घोषणा केली आहे.

प्रभाग क्रमांक ३ या प्रभागातील लढत अत्यंत प्रतिष्ठेची होती. महायुतीमध्ये असले तरी स्थानिक पातळीवर शिवसेना (शिंदे गट) आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) आमनेसामने उभे होते. शिंदे सेनेकडून लक्ष्मण मारुती पारधी हे नशीब आजमावत होते. तर त्यांच्या विरोधात भाजपच्या ज्योती संदीप बाणखेले यांनी तगडे आव्हान उभे केले होते.

दोन्ही बाजूंनी विकासकामांचे आणि जनसंपर्काचे दावे करत जोरदार मोर्चेबांधणी केली होती. मतमोजणीच्या दिवशी प्रभाग ३ ची फेरी सुरू झाली तेव्हा क्षणाक्षणाला उत्कंठा वाढत होती. शेवटच्या फेरीअखेर जेव्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अधिकृत आकडेवारी जाहीर केली, तेव्हा दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी २२३ मते मिळाली.

       

यामुळे मतमोजणी केंद्रात काही काळ शांतता पसरली. कोणीही कोणापेक्षा एक मतानेही पुढे नव्हते. पुनर्मोजणीनंतरही तोच आकडा कायम राहिला. त्यामुळे आता कसा निर्णय घ्यायचा, हा प्रश्न प्रशासनासमोर उभा ठाकला.

जेव्हा दोन उमेदवारांना समान मते पडतात, तेव्हा निवडणूक नियमावलीनुसार चिठ्ठी टाकून निर्णय घेतला जातो. त्यानुसार, दोन्ही उमेदवारांच्या नावाची चिठ्ठी तयार करण्यात आली. मोजणी केंद्रातील एका निष्पाप लहान मुलाला बोलावून त्याला एक चिठ्ठी उचलण्यास सांगण्यात आले. दोन्ही उमेदवारांचे डोळे त्या चिमुकल्याच्या हाताकडे होते. एकीकडे छातीची धडधड वाढली होती. दोन्हीही उमेदवारांच्या पोटात गोळा आला होता.

त्या मुलाने एक चिठ्ठी उचलली आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यावरचे नाव वाचले “लक्ष्मण मारुती पारधी”. हे नाव पुकारताच शिवसेनेच्या गोटात आनंदाचे उधाण आले. तर अवघ्या काही इंचांनी विजय हुकल्याने भाजप समर्थकांमध्ये नाराजी पसरली.

विजयी घोषित झाल्यानंतर लक्ष्मण पारधी भावूक झाले होते. “मतदारांनी मला पसंती दिलीच होती, पण देवानेही माझ्यावर विश्वास दाखवला,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!