पुण्यातील 5 स्टार हॉटेलमध्ये बॉम्ब असल्याचा कॉल; पोलीस तपासात धक्कादायक खुलासा..

पुणे : शहरातील प्रसिद्ध असलेल्या कोरेगाव पार्कमधील पंचतारांकित हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा कॉल आल्याने सर्वत्र खळबळ उडाली. धमकीचा कॉल आल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता हॉटेलमध्ये आलेला कॉल हा फेक कॉल असल्याचं निष्पन्न झालं.

समोर आलेल्या माहितीनुसार, पुण्यातील कोरेगाव पार्क येथील 5 स्टार हॉटेल बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली होती. हॉटेलमध्ये धमकीचा कॉल आल्यानंतर त्वरीत हॉटेल रिकामे करण्यात आले. पोलीस आणि बॉम्ब शोधक पथकाने तात्काळ हॉटेलची तपासणी केली मात्र पोलिसांना बॉम्ब मिळाला नाही. त्यानंतर हॉटेलवर आलेला कॉल हा ‘फेक कॉल’ असल्याचे स्पष्ट झालं.त्यानंतर पुण्यातील कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी हॉटेलचे सिक्युरीटी मॅनेजर यांनी फिर्याद दिलीय. कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात ९८३२२५२५१७ या मोबाईल क्रमांक धारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , शुक्रवारी एका मोबाईल नंबर वरून पुण्यातील कोरेगाव पार्क भागात असलेल्या पंच तारांकित हॉटेलच्या अधिकृत लँडलाईनवर फोनवर कॉल आला. मोबाईल वरून संबंधित व्यक्तीने “हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवला आहे.तात्काळ हॉटेल रिकामे करा” अशी धमकी दिली. हॉटेल प्रशासनाने तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली. अवघ्या काही वेळातच पोलीस आणि बॉम्ब शोधक व नाशक पथक हॉटेलवर दाखल झाले. हॉटेलची कसून तपासणी करण्यात आली. त्यानंतर हा खोटा व बनावट कॉल असल्याचे समोर आले. हा खोडसाळ प्रकार कोणी केला आहे याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

