पाकिस्तानात स्टेडियमबाहेर बसमध्ये बॉम्बस्फोट
क्वेटा: पाकिस्तान सुपर लीगच्या प्रदर्शनीय सामन्यादरम्यान क्वेटा स्टेडियम जवळील एका बसमध्ये स्फोट झाल्याचं वृत्त आहे. स्फोटाचं ठिकाण स्टेडियमपासून केवळ 15 ते 20 मिनिटांच्या अंतरावर होतं, अशी माहिती मिळत आहे.
स्फोटानंतर सामना थोडा वेळ रद्द केल्यानंतर प्रेक्षकांनी केली मैदानावर दगडफेक
क्वेटा येथील मुसा चौक येथील नवाब अकबर बुगाती स्टेडियममध्ये पेशावर झाल्मी आणि क्वेटा ग्लॅडिएटर्स यांच्यातील पाकिस्तान सुपर लीगचा प्रदर्शनीय सामना खेळवण्यात येत होता. पण, स्टेडियमबाहेर मुसा चौकात बसमध्ये स्फोट झाला. या स्फोटाचे हादरे स्टेडियमला बसले. या सामन्यात पाकिस्तानच्या अनेक स्टार खेळाडूंशिवाय माजी क्रिकेटपटूंचाही सहभाग होता. यानंतर कर्णधार बाबर आझम आणि शाहिद आफ्रिदी यांच्यासह प्रमुख पाकिस्तानी क्रिकेटपटूंना सुरक्षेद्वारे ड्रेसिंग रूममध्ये नेण्यात आले.
पोलिस लाइन्स परिसरात हा स्फोट झाला असून त्यात पाच जण जखमी झाले आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बचाव कार्य पूर्ण झाले असून जखमींना रुग्णालयात नेण्यात आले आहे. तेहरिक-ए-तालिबान पाकिस्तानने (टीटीपी) रविवारी एका निवेदनात हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून, सुरक्षा अधिकाऱ्यांना लक्ष्य करण्यात आले होते. स्फोटानंतर स्टेडियमबाहेरील प्रेक्षकांनी मैदानावर दगडफेक सुरू केली. काही वेळानंतर हा सामना पुन्हा सुरू करण्यात आला.