जामनेरच्या अभियंत्याचा मृतदेह अखेर सापडला ; चेन्नईतील समुद्र दुर्घटनेत महाराष्ट्रातील मृतांचा आकडा 7 वर

चेन्नई: चेन्नईच्या समुद्रामध्ये महाराष्ट्रातील तीन मुलं वाहून गेल्याची घटना काही दिवसापूर्वी घडली होती.या घटनेमध्ये जळगाव जिल्ह्यातील 21 वर्षीय जय पाटील या तरुणाचा देखील समावेश होता. तब्बल तीन दिवसानंतर चेन्नईच्या समुद्रात या मुलाचा मृतदेह आढळून आला आहे. एकुलता एक मुलाचा मृतदेह आढळुन आल्यामुळे पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, चेन्नईतील समुद्रकिनाऱ्यावर सेल्फी घेत असताना अचानक दहा ते पंधरा फूट उंचीची प्रचंड लाट उसळली आणि क्षणार्धात काही जणांना समुद्राच्या खोल पाण्यात खेचून नेलं. या दुर्घटनेत आतापर्यंत सात जणांचे मृतदेह सापडले असून त्या चार मुले आणि तीन मुलींचा समावेश आहे. यामध्ये भंडारा येथील मयुरी चौधरीसह नागपूर, नांदेड, मराठवाडा, विदर्भ आणि खानदेशातील विद्यार्थ्यांचा मृतामध्ये समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
जय हा पाळधी तालुका जामनेर येथील नरेंद्र रामलाल पाटील यांचा एकुलता एक मुलगा होता. वडील हे शेतकरी असून आई ही नाईक विद्यालयात उपशिक्षिका म्हणून कार्यरत आहे. त्याची बहीण बारावीला असून जय हा इंटरशिपसाठी चेन्नई येथे गेला असताना त्याच्यासोबत ही घटना घडली. या घटनेने जामनेर मध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेनंतर तामिळनाडू अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. तसेच बचाव आणि शोध कार्याचे वैयक्तिकरित्या निरीक्षण केले. जय पाटीलला शोधण्यासाठी तामिळनाडू सरकारला प्रयत्न जलद करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आले होते. परंतु आज सकाळी जयचा देखील मृतदेह आढळून आला आहे. मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे.