पुण्यात रक्ताचा थरार! दाबेली विक्रेत्या तरुणाच्या गळ्यावर हल्लेखोराकडून सपासप वार, खुनाचे कारण अस्पष्ट

पुणे : विद्येचे माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्यात गुन्हेगारी घटनांचे प्रमाण वाढताना दिसत असतानाच आता पर्वती दर्शन भागात कच्छी दाबेलीविक्रेत्या तरुणाच्या गळ्यावर चाकूने वार करून खून करण्यात आल्याची घटना समोर आले आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दानिश सिद्दिकी (वय २५, रा. पर्वती दर्शन) असे मृत तरुणाचे नाव आहे.दानिश हा त्याचा भाऊ, त्याची पत्नी यांच्यासह काही वर्षांपासून पर्वती दर्शन भागात राहायला आहे. पर्वती दर्शन भागातच हातगाडीवर कच्छी दाबेली विक्री करतो. दानिश याच्या घराचा दरवाजा उघडा असताना हल्लेखोर त्याच्या घरात शिरला. हल्लेखोराकडे चाकू होता. दानिशने त्याला पकडले. दोघांमध्ये झटापट झाली. त्यात हल्लेखोराने चाकूने दानिशच्या गळ्यावर वार केला. दानिश रक्ताच्या थारोळ्यात काेसळला. दानिशला गंभीर जखमी अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान पोलिसांनी पसार झालेल्या दिनेश प्रभाकर क्षीरसागर (वय ३५, रा. यवतमाळ) याला अटक केली आहे. खुनामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.हल्लेखोराची पोलिसांनी कसून चौकशी केली आहे.मात्र हल्लेखोराने दानिशचा खून का केला, यामागचे कारण समजू शकले नाही. प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती पर्वती दर्शन पोलिसांनी दिली.
