भाजपचा काका -पुतण्यांना धक्का ; बालेकिल्यातील दिग्दज नेते गळाला..

पुणे : विधानसभा निवडणुकीत मिळवलेल्या यशानंतर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपने जोरदार मोर्चे बांधणी केली आहे. या पार्श्वभूमीवरच आता भारतीय जनता पक्षाने मिशन बारामतीवर विशेष लक्ष केंद्रित केलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या काका- पुतण्यांना मोठा धक्का बसणार आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या बारामती वगळता जवळपास सर्वच विधानसभा मतदारसंघांमध्ये दिग्गज नेत्यांना आपल्या गोटात आणल्यानंतर, आता भाजपने आपला मोर्चा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर गावपातळीवर वळवला आहे. याचअंतर्गत अनेक नेत्यांना पक्षप्रवेश देण्याची मालिका सुरू झाली आहे.बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर-राजगड-मुळशी विधानसभा मतदारसंघांतून भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर नेते आणि कार्यकर्त्यांना प्रवेश दिला आहे. हा पक्ष प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेससाठी (अजित पवार गट) मुळशी तालुक्यातील मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या भाजप प्रवेशानंतर आता त्यांच्या नेतृत्वाखाली मुळशीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या चार दिग्गज नेत्यांसह १५ गावांचे सरपंच-उपसरपंच आणि ५० हून अधिक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यामुळे मुळशीतील भाजपची ताकद आणखीनच वाढली आहे.
प्रवेश घेणाऱ्यांमध्ये माजी सभापती, पीएमआरडीएचे सदस्य, विविध संस्थांचे संचालक आणि विद्यमान सरपंचांचा समावेश आहे. संग्राम थोपटे यांच्या प्रवेशानंतरच मुळशीतील राजकीय समीकरणे बदलू लागली होती. आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( अजित पवार गट) तसेच राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट) या दोन्ही गटांतील महत्त्वाच्या नेत्यांचा भाजप प्रवेश झाल्याने दोन्ही गटांना एकाचवेळी मोठा फटका बसला आहे.या प्रवेशांमुळे मिशन बारामतीबाबत भाजप किती गंभीर आहे, यावर राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.