दौंड पंचायत समितीत सभापतीपदी भाजपचे सुखदेव चोरमले तर उपसभापती अमृता गिरमकर यांची निवड…

दौंड : पुणे जिल्ह्यातील पंचायत समितीच्या सभापती उपसभापतीची निवड आज करण्यात आली यामध्ये दौंड पंचायत समिती सभापती आणि उपसभापती निवडणूकीत ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस ने माघार घेतल्याने दौंड पंचायत समितीवर भाजपचे निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित झाले आहे. यानंतर अधिकृतपणे घोषणा करण्यात आली.

सभापती सुखदेव सोनबा चोरमले आणि उपसभापती अमृता अभिमन्यू गिरमकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. यानंतर कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. याबाबत माहिती निवडणूक निर्णय अधिकारी रेवणनाथ लबडे यांनी दिली.
सभापतीसाठी भाजप कडून सुखदेव सोनबा चोरमले, राष्ट्रवादी काँग्रेसकडू प्रदीप किसन दिवेकर, आणि उपसभापती राष्ट्रवादी काँग्रेसकडून मनिषा संतोष ताकवणे, भाजपकडून अमृता अभिमन्यू गिरमकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यामुळे निवडणूक बिनविरोध होणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला.

नंतर उमेदवारी अर्ज माघार घेण्याच्या मुदत वेळेत प्रदीप दिवेकर यांनी सभापती, तर मनिषा ताकवणे यांनी उपसभापती पदाचे दाखल उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे सभापती पदासाठी सुखदेव सोनबा चोरमले आणि उपसभापती अमृता गिरमकर यांची बिनविरोध निवड झाली. निवडणुकीत भाजपचे ८ उमेदवार तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ६ सदस्य निवडून आले होते.