भाजपची मोठी खेळी! एकनाथ शिंदेंना मुबंईच्या सत्तेत थारा नाही? महत्त्वाच्या 3 पदावर दावा..

मुंबई : बहुचर्चित मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर अद्यापही सत्ता स्थापनेचा तिढा सुटलेला नाही. या महापालिका निवडणुकीत भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची सत्ता स्थापन होणार आहे. मात्र भाजप नेत्यांकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मुंबईचा सत्तेत वाट देण्यास नकार दिल्याच्या चर्चा सुरू आहेत.तसेच भाजपने महापौर, उपमहापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष या तीन महत्त्वाच्या पदांवर दावा केल्याने शिंदे सेनेची गोची होण्याची शक्यता आहे.

मुंबई महापालिकेत सर्वाधिक जागा भाजपला मिळाल्या आहेत.तर शिंदेंच्या शिवसेनेकडे मोजक्याच जागा आहेत. पण शिंदेंच्या शिवसेनेशिवाय भाजपला सत्ता स्थापन करता येत नाही. त्यामुळे मुंबई महापालिकेत शिंदेंच्या शिवसेनेकडून मोठ्या पदासाठी दावा केला जात आहे. मात्र भाजपकडून शिंदेंच्या शिवसेनेला थारा दिला जात नाही. आता भाजपने मुंबई महापालिकेच्या महत्त्वाच्या ३ पदांवर दावा केला असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर महापालिकांमध्ये शिंदेसेनेला महापौर पद सोडल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत महत्त्वाची पदे भाजपकडेच राहावीत अशी भूमिका नेत्यांनी घेतली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी कोंडी होणार आहे.

मुंबई महापालिकेत भाजपला 89 तर शिंदेच्या शिवसेनेला 29 जागांवर विजय मिळाला आहे.मुंबईत सर्वाधिक नगरसेवक भाजपचे निवडून आल्याने तिन्ही पदांवर पक्षाचा डोळा आहे. याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीत लवकरच चर्चा करून अंतिम निर्णय होईल, अशी माहिती समोर आली आहे.