‘ मतचोरी ‘च्या आरोपांवर भाजपचा मोठा पलटवार ; थेट सोनिया गांधींवरच केला मोठा आरोप

पुणे : मतदान प्रक्रियेतील हेराफेरी आणि मतांच्या चोरीचा मुद्दा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशभरात नेलेला असल्याने भाजप आक्रमक झाला आहे. यावर आता भाजपने पलटवार करत थेट सोनिया गांधी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सोनिया गांधी भारताच्या नागरिक नसताना त्यांचे नाव मतदान यादी दोन वेळा आले होते असा गंभीर आरोप भाजपचे माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रभारी अमित मालवीय यांनी केले आहेत.
भाजपचे माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रभारी अमित मालवीय यांनी बुधवारी एक्सवर पोस्ट लिहून राहुल गांधी करीत असलेला विरोध म्हणजे मतदान कायद्याचे स्पष्टपणे उल्लंघन आहे. ज्यांचे मतदान अवैध आहे किंबहुना अयोग्य आहे अशा लोकांचे मतदान राहण्यासाठी राहुल गांधी का आग्रही आहेत? असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच त्यांनी थेट सोनिया गांधी यांच्यावर आरोप केले आहेत.सोनिया गांधी या भारताच्या नागरिक नसतानाही, त्यांचे नाव मतदान यादीत दोन वेळा आले होते, असा गंभीर आरोप अमित मालवीय यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी काही पुरावे समाज माध्यमांवरील मंचांवरुन सादर केले आहेत.
तसेच सोनिया गांधी आणि राजीव गांधी यांचे लग्न देश१९६८ साली झालेले असताना लग्नाच्या तब्बल १५ वर्षानंतर सोनिया गांधी यांनी नागरिकत्व का घेतले? असा सवाल करीत एकाच व्यक्तीचे नाव दोन वेळा मतदान यादीत कायदा पायदळी तुडवून नोंदविण्यात आले हा प्रकार निवडणुकीत फेरफार केल्याचा नव्हता का? असा सवाल मालवीय यांनी विचारला आहे. यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटणार आहे.