हवेलीत युती पूर्वीच भाजपची राष्ट्रवादीवर मोठी कडी! जिल्हा परिषदेच्या प्रभाग रचनेत भाजपच्या आदेशाचीच घडी…


जयदिप जाधव

उरुळीकांचन : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या ३ वर्षे रखडलेल्या निवडणुकीनंतर दृष्टीक्षेपात असलेल्या निवडणूकीच्या प्रारुप गटरचनेवरून सत्ताधारी भाजप व राष्ट्रवादीच्या पदाधिकारी यांच्यात प्रचंड कुरघोडी रंगली असून गट व गण रचनेच्या अंतिम हरकतींवरील सुनावणी विभागीय आयुक्तांनी घेतल्यानंतरही मर्जी प्रमाणे गट रचना करण्यासाठी अधिकाऱ्यांवर प्रचंड दबावाचा ड्रामा हवेली तालुक्यात रंगला असून तालुक्यात एकूण ६२ प्राप्त हरकतींवर तब्बल ५८ हरकतींना आयुक्तांनी मान्यता दिली असून या हरकती मान्य केल्याने प्रारुप गटरचनेत मोठा बदल झाल्याची चर्चा तालुक्यात असून युतीपूर्वीच मोठ्या भावाने लहान भावावर कडी केल्याची चर्चा तालुक्यात आहे.

हवेली तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीसाठी ६ गट व १४ पंचायत समिती निवडणूकीसाठी १४ जुलै रोजी प्रारुप गट व गण रचना प्रसिद्ध झाली होती. २१ जुलैपर्यंत विभागीय आयुक्तांकडे झालेल्या हरकतीत ६२ हरकती तालुक्यातून प्राप्त झाल्या आहेत. या हरकतींवर ६ ऑगस्ट रोजी सुणावणी होण्यापूर्वीच पूर्व हवेलीत राजकीय चक्र वेगाने फिरली असून गट व गण रचना समर्थकांच्या मर्जीनुसार व्हावी म्हणून दोन्ही सत्ताधारी पक्षांकडून जोरदार फिल्डींग लावून नियमावली पुढे करुन गट व गण रचनेत बदल करण्यात आल्याची चर्चा आहे

संपूर्ण हवेली तालुक्याच्या गट रचनेत पश्चिम तालुक्यात एक गट वगळता पूर्व हवेलीतील गट रचना राजकीय हस्तक्षेपांनी चर्चेत आली आहे. या पाचही जिल्हा परिषदांच्या गट रचनेत सर्व गटांची रचना बदलण्यासाठी सत्ताधारी प्रमुख पक्षांनी आपले वजन वापरल्याची चर्चा आहे. या गटरचनेत हरकतींपूर्वीच विशेष बाब म्हणून मान्यता घेऊन पाचही जिल्हा परिषद गटांत मोठे बदल व राजकीय परिस्थिती पाहून गटरचना झाल्याची चर्चा तालुक्यात आहे.

अशातच आयुक्तांकडील हरकतींवर ६२ पैकी ५८ हरकती मान्य झाल्याने प्राधिकृत अधिकाऱ्यांनी प्रारूप आराखडा तयार करताना झालेल्या गटरचनेत राजकीय प्रभावानेच गट रचनेत बदल झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे पूर्व हवेलीत प्रारुप आराखडा तयार करताना अधिकाऱ्यांनी निवडणूक आयोगाचे निकष पाळले नाही की ? प्रारुप आराखड्यात इतक्या मोठ्या प्रमाणात बदल झाल्याने तालुक्यात निवडणुकीचा विषय चर्चेचा ठरला आहे. परंतु जिल्ह्यात प्रभाग रचनेत सत्ताधारी पक्षांत नसलेली स्पर्धा हवेलीत मात्र चांगलीच जोर खाऊ लागली आहे.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!