भाजप- शिंदे गट- पवार गट यांच्या आगामी विधानसभेच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला आला समोर, जाणून घ्या…
मुंबई : राज्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमधल्याच दोन गटांमध्ये चालू असलेल्या कलगीतुऱ्याची जोरदार चर्चा चालू आहे. अजित पवार यांच्या नेतृ्त्वाखाली एक गट सरकारमध्ये सहभागी झाला असून एक गट अजूनही शरद पवारांसोबत आहे.
अजित पवार यांनी ८ नेत्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये बंड करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तसेच पक्षाचे चिन्ह आणि पक्षावर आपलाच हक्क असल्याचा दावा त्यांनी केला.
वर्षभरापूर्वी शिंदे-फडणवीस सरकारविरोधात बसलेले अजित पवार अचानकपणे सत्तेत सहभागी झाल्याने सगळ्यांना धक्का बसला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीमध्ये दोन गट पडले आहेत.
तसेच आगामी निवडणुकीसाठी अजित पवार आणि भाजप यांच्यामध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण ४८ आणि विधानसभेच्या २८८ जागा असून त्यापैकी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या नेतृत्वात आगामी लोकसभेच्या निवडणुकीत १३ आणि विधानसभेच्या निवडणुकीत ९० जागा लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
दरम्यान, एका आयोजित कार्यक्रमादरम्यान, अजित पवार यांनी आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ९० जागा लढवेल आणि ७१ पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवेल, असा विश्वास अजित पवारांनी व्यक्त केला होता.