हवेलीत ‘ यशवंत’ कारखान्यासाठी सत्ताधारी भाजप संधीचे सोने करणार काय ? पदासाठी चढाओढ करणारे मदतीसाठी चढाओढ करणार काय ..!

जयदीप जाधव

उरुळी कांचन :
येत्या ११ मार्च रोजी थेऊर (ता.हवेली ) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याची विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. संस्थेच्या अस्तित्वाविषयीची ही सर्वसाधारण सभा असल्याने या सभेतून काय निर्णय होतो, म्हणून या सभेकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. कारखान्याचा अर्थिक लेखाजोखासह भविष्यात कारखाना सुरू करण्यासाठी काय निर्णय घायचा म्हणून सभासदांच्या कोर्टात चेंडू पडला आहे. सभासद कारखाना सुरू करण्यासाठी संचालक मंडळाची निवडणूक घेऊन सामोरे जाण्याचा निर्णय घेणार, का संस्थेला भाडेतत्त्वावर देण्यासाठी मान्यता देणार म्हणून निर्णय घेणार, म्हणून सभासदांचा निर्णय महत्वाचा आहे. परंतू सत्ताधारी भाजप या प्रक्रियेकडे कसे पाहतो म्हणून सर्वांचे त्यांच्या भूमिकेकडे लक्ष असून सत्ताधारी भाजप संधीचे सोने करणार का?हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
११ वर्षे बंद पडलेल्या यशवंत सहकारी साखर कारखान्यासंदर्भात सहकार विभाग व शासन नियुक्त प्रशासक मंडळाने कारखाना सुरू करण्याचा विचार सभासदांपुढे ठेवला आहे. तो संचालक मंडळाची निवडणूक घेऊन करायचा की, भाडेतत्त्वावर देऊन करायचा म्हणून सभासदांची परवानगी घेणे तसेच भागभांडवल उभारणीसाठी इतर काय तरतूद करता येईल म्हणून सभासदांशी चर्चा होणार आहे. तसेच संस्थेची मालमत्ता कर्जाचा लेखाजोखा, वारस नोंदी, भाग हस्तांतरण आदी निर्णय घेण्यासाठी सभा आयोजित केली आहे. परंतु या प्रक्रियेत प्रथम संस्था चालू करणे, सभासद व कामगारांची देणी या मुद्द्यावर सभासदांना उत्तर अपेक्षित असणार आहे. त्यासाठी ही बैठक ही महत्त्वाची ठरणार आहे. कारखान्याचे इतके वर्षे न झालेले लेखापरिक्षण व आवसायकाची नियुक्ती रद्दबातल झाल्याने सभासदांचा विश्वास संस्था चालू होण्यात वाढला आहे.

राज्याचे साखरआयुक्त शेखर गायकवाड यांनी कारखान्याला भेट देऊन त्यांच्या सूचनेप्रमाणे शासन नियुक्त समितीने लावलेल्या बैठकीत कारखाना सुरू करण्यासाठी सरकारचे धोरण काय आहे म्हणून चर्चा होणाऱ आहे. त्यामुळे संस्थेला राज्य सरकारची मदत, कर्जाची उपलब्ध ता आदी पर्याय मांडले जाऊन निर्णय होणार आहे. परंतू या सभेत सत्ताधारी भाजप मंडळी काय भूमिका मांडणार म्हणून त्यांच्या भूमिकेला मोठे महत्त्व असणार आहे. कारण केंद्रात व राज्यात भाजप प्रणीत डबल इंजीन सरकार आहे. नुकताच महाराष्ट्र राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बंद पडलेल्या सहकारी साखर कारखान्यांना चालू करण्यासाठी थेट सरकार अर्थिक मदत करणार असल्याचे जाहीर केले आहे.
त्याचधर्तीवर शेजारील दौंड तालुक्यातील भिमा सहकारी साखर कारखाना सरकारच्या मदतीने सुरू केला आहे. यासाठी आमदार राहुल कुल यांचे प्रयत्न महत्वाचे ठरले आहे. तसेच प्रयत्न सत्ताधारी भाजपकडून हवेलीत होईल काय म्हणून सभासदांना अपेक्षा आहे.
केंद्र व राज्य सरकार इथेनॉल उत्पन्नासाठी अनेक पॉलिसी आखत आहे. अशा पॉलिसी या कारखान्यासाठी वापरल्यास निश्चित संस्थेला मदत होईल अशी अपेक्षा आहे.त्यासाठी प्रयत्न होणार का मदत अपेक्षित असणार आहे.
रोहिदास उंद्रे यांनी पुढाकार घ्यावा ?
हवेली तालुक्यात सहकार क्षेत्रात काम केलेले व कारखान्यात उपाध्यक्षपद सांभाळलेले रोहिदास उंद्रे हे भाजपचे नेते आहेत. त्यांनी यापूर्वी दिवंगत आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या बरोबर कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यांचे वरिष्ठ पातळीवर नेतेमंडळीशी संबंध आहेत. त्यामुळे त्यांचा अनुभव संस्थेला मदतगार होऊ शकतो असा कयास बांधला जात आहे.