भिगवण अपहरण प्रकरणावरून भाजप आमदार राहुल कुल वादाच्या भोवऱ्यात ; तरुणीच्या आईचा गंभीर आरोप….

पुणे : इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील तरुणीच्या अपहरण प्रकरणाला आता राजकीय वळण लागलं आहे. या अपहरण प्रकरणात दौंडचे भाजप आमदार राहुल वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. संबंधित तरुणीच्या आईसह इतर नातेवाईकांनी आमदार राहुल कुल आरोपींना मदत करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात देखील आता खळबळ उडाली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार,आरोपी तरुणाचा नातेवाईक असलेल्या अजहर शेख याने आमदार राहुल कुल यांचा फोटो स्टेटसवर ठेवून ‘सदैव एकनिष्ठ’ असा मजकूर त्यावर लिहिला होता. या पार्श्वभूमीवर गोपीचंद पडळकर यांनी आरोपींना इतकी मस्ती कुठून येते, असं म्हणत थेट अजहर शेख याचे व्हॉट्सअॅप स्टेटस मीडियासमोर दाखवत नाव न घेता आमदार राहुल कुल यांच्यावर निशाणा साधला. त्यानंतर आता तरुणीच्या आईनेही आमदार राहुल कुल यांचे नाव घेतल्याने ते वादात सापडले आहेत.
संबंधित तरुणीने मी स्वतःच्या मर्जीने तरुणाच्यासोबत निघून आल्याचं व्हिडिओतून सांगितलं होतं. पण तरुण-तरुणी फरार असताना असे व्हिडिओ पोलिसांपर्यंत आणि त्यांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचवण्याची आरोपींची हिंमत होते, याचा अर्थ या आरोपींच्या मागे कोणतीतरी राजकीय ताकद उभी असल्याचा आरोप भाजपचेच आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला होता. त्यानंतर राजकीय वातावरण चांगलं तापलं आहे.

आता या प्रकरणानंतर संबंधित तरुणीच्या आईने देखील आमदार राहुल कुल आरोपींच्या पाठीशी असल्याचा आरोप केला आहे.या भिगवण प्रकरणाला आता राजकीय वळण लागल्याने हा मुद्दा आणखीनच तापण्याची शक्यता आहे. तरुणीच्या कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांबाबत अद्याप राहुल कुल यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. ते याबाबत आपली बाजू कशा पद्धतीने मांडतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.