ज्याला हिजाब घालायचाय त्याने पाकिस्तानात जावं! भाजप नेत्याचं धक्कादायक वक्तव्य, राजकीय वातावरण तापले..

नवी दिल्ली : पाटण्यामध्ये नियुक्ती पत्र वाटप करताना एका महिला डॉक्टरचा हिजाब काढण्याचा प्रयत्न केल्याबद्दल विरोधी पक्ष बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर निशाणा साधत आहे. अशातच आता भाजपने मुख्यमंत्र्यांना पाठिंबा दिला आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभूषण ठाकूर बचौल यांनी नितीश कुमार यांचं समर्थन करत हिजाब पूर्ण भारतात बॅन झाला पाहिजे, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे. सार्वजनिक ठिकाणी आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये हिजाबवर बंदी घालावी, अशी मागणी हरिभूषण यांनी केली आहे.
हरिभूषण म्हणाले, हिजाबच्या नावाखाली फक्त दहशतवाद फोफावत आहे. दहशतवादी हल्ले करून दहशतवादी हिजाब घालून पळून जातात. ज्याला हिजाब घालायचा आहे, त्यांनी पाकिस्तानात जावं. मुख्यमंत्री नितीश कुमार माफी मागणार नाहीत, असं ते म्हणाले. महिला डॉक्टरचा हिजाब ओढून त्यांनी बरोबरच केलं आहे.

हिजाब घालून नियुक्तीपत्र घेण्यासाठी आलेल्या महिला डॉक्टरने बिहार सोडलं पाहिजे. ती चेहरा लपवून नियुक्तीपत्र घेण्यासाठी गेली होती, असं देखील हरिभूषण ठाकूर बचौल म्हणाले. आहे. दरम्यान, भाजप नेत्याच्या वक्तव्यानंतर वातावरण तापलं आहे.

आरजेडी नेते मुकेश कुमार रोशन यांनी बचौल यांच्यावर निशाणा साधला आणि म्हणाले, हिंदू आणि मुस्लिमांमध्ये वाद भडकवण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यांना तात्काळ अटक करा… असं देखील कुमार रोशन म्हणाले.
