वाल्मिक कराडच्या पुण्यातील मालमत्तेत भाजपच्या बड्या नेत्याची मध्यस्थी, नेमका ‘तो’ नेता कोण? माहिती आली समोर..

बीड : बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड ३१ डिसेंबरला पुण्यात सीआयडीच्या मुख्यालयात शरण आला. त्याआधी तो पुण्यातच लपल्याची बरीच चर्चा होती. त्यामुळे कराडचं पुणे कनेक्शन समोर आले आहे.
त्याने पुण्यात दुसऱ्या पत्नीच्या नावे दोन ऑफिस घेतले आहेत. यामध्ये दत्ता खाडे यांच्या मध्यस्थीचा संशय व्यक्त केला जात आहे. सीआयडीच्या तपासानुसार, कराडने पुण्यात फर्ग्युसन रोडवरील एक इमारत तसेच हडपसर आणि पिंपरी चिंचवडमध्ये कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तांची खरेदी केली आहे.
या प्रकरणात खाडे यांच्या कथित सहभागामुळे त्यांची चौकशी करण्यात आली आहे. खाडे यांनी त्यांची बाजू मांडताना, मी सीआयडीकडे चौकशीसाठी गेलो होतो आणि त्यांना समाधानकारक उत्तरे दिली आहेत. कराडशी माझी केवळ तोंडओळख होती, परंतु कोणत्याही गुन्ह्यात माझा संबंध नाही, असे स्पष्ट केले आहे.
दरम्यान, वाल्मिक कराडवर मस्साजोगच्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येसाठीही आरोप आहेत. यामुळे, पुण्यातील कराडच्या संपत्तीच्या खरेदीच्या आणि दत्ता खाडे यांच्या कथित सहभागाच्या तपासावर सध्या सीआयडी लक्ष ठेवून आहे. पुढील तपासात आणखी काय उघड होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.