मावळमध्ये भाजपनं भाकरी फिरवली! पक्षाची सर्वाधिकार असलेली कोअर कमिटी बरखास्त, तरुणांकडे सूत्रे जाणार?

पुणे : पुणे जिल्ह्यात मावळमध्ये सलग पराभव,अंतर्गत गटबाजी आणि बदलत्या राजकीय समीकरणाच्या पार्श्वभूमीवर भाजपने अखेर मोठा निर्णय घेतला आहे.भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी मावळात भाकरी फिरवली आहे. पक्षाची सर्वाधिकार असलेली कोअर कमिटी बरखास्त केली आहे. आता तरुण नेतृत्वाकडे सूत्रे देण्याचा निर्णय भाजप घेणार असल्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.

नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत झालेला पराभव भाजपसाठी मोठा धक्का ठरला आहे. कार्यकर्त्यांनी देखील उघडपणे नाराजी व्यक्त करत संघटनात्मक बदलांची मागणी केली. तसेच आगामी होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकांसाठी पक्षाची प्रतिष्ठा महत्त्वाची मानली जात आहे. या सर्व गोष्टींचे आत्मपरीक्षण करता नव्या कोअर कमिटीमध्ये तरुण नेतृत्वाला संधी देत संघटनात्मक पुनर्बांधणीवर भर दिला जाणार आहे. तरुण आणि कार्यशील कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणावर संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे, कोअर कमिटीचे अध्यक्ष निवृत्ती शेटे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांची नुकतीच पवानानगर येथे बैठक झाली. यात हा कोअर कमिटी बरखास्त करण्यात आली.

आगामी निवडणुकीत रणनीती, संघटनात्मक बदल, पक्षविरोधी कारवायांवर आदी विषयावर बैठकीत चर्चा झाली. बूथस्तरावरील मजबुती,आधुनिक निवडणूक रणनीती आणि तळागाळातील संवाद वाढविणे यावर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार असल्याचे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.
भाजपच्या पक्षश्रेष्ठींच्या या निर्णयानंतर तरुण नेतृत्व, एकसंघ रणनिती आणि कार्यकर्त्यांचा जोश या त्रीसूत्रीवर पक्ष पुन्हा भगवा फडकवणार का याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागल आहे.