नवी मुंबईत भाजपला खिंडार, २ बड्या नेत्यांचा ५०० कार्यकर्त्यांसह शेकापमध्ये प्रवेश

मुंबई :आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऑपरेशन लोटस यशस्वी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपलाच नवी मुंबईत शेकापने मोठं खिंडार पाडलं आहे.भाजपच्या दोन दिग्गज महिला नेत्यांनी ५०० कार्यकर्त्यांसह शेकापमध्ये पक्ष प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

नवी मुंबईच्या कळंबोलीमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. कळंबोली परिसरातील भाजपच्या सक्रिय नेत्या गौरी कोरडे आणि यशोदा आलदर यांनी भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकला. या दोन्ही महिला नेत्यांनी शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश केला. भाजपच्या वरिष्ठांकडून गोरगरीब जनतेची कामे होत नसल्याचा आरोप करत त्यांनी जवळपास ५०० कार्यकर्त्यांसह शेकापचा झेंडा हातामध्ये घेतला. या पक्षप्रवेशामुळे नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

गौरी कोरडे आणि यशोदा आलदर यांचा पक्षप्रवेश सोहळा शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या पक्षप्रवेशामुळे कळंबोलीतील राजकीय समीकरणांमध्ये लक्षणीय बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी काळात याचे पडसाद स्थानिक राजकारणात उमटतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

