चौफेर टिकेनंतर भाजपला उपरती; बदलापूर प्रकरणातील आरोपी तुषार आपटेंचा अवघ्या 24 तासात राजीनामा

मुंबई : भाजपने बदलापूरातील बाललैंगिक अत्याचार प्रकरणातील सहआरोपी तुषार आपटे याची स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती केल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापलं. त्यानंतर भाजपवर विरोधकांकडून टीकेची झोड उठली. अवघ्या 24 तासात तुषार आपटे यांनी स्वीकृत नगरसेवकाचा राजीनामा दिला आहे.

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी तुषार आपटे यांचा राजीनामा स्वीकारला आहे. लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला नगरसेवक करणे हेच पार्टी विथ डिफरन्स असल्याचा घनघात विरोधी पक्षाने केला होता. चौफेर टीका झाल्यानंतर तुषार आपटे यांनी ठाणे जिल्ह्यातल्या कुळगाव बदलापूर नगर परिषदेतल्या स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा दिला.
बदलापूरमधील एका नामवंत शाळेत ऑगस्ट 2024 मध्ये सफाई कर्मचाऱ्याने 4 वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केले होते. वैद्यकीय अहवालात एका मुलीच्या गुप्तांगाला दुखापत झाल्याचं समोर आल्यानंतर पीडित मुलीचे कुटुंबीय अहवाल घेऊन शाळेत गेले, मात्र शाळेने सर्व आरोप फेटाळून लावले होते. त्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी 11 तासानंतर शाळेचा सफाई कर्मचारी अक्षय शिंदे याच्यावर गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान अक्षय शिंदे याचा पोलिसांच्या एनकाऊन्टरमध्ये मृत्यू झाला. या घटनेनंतर बदलापूर शहरात मोठं जन आंदोलन करण्यात आलं होतं. त्यानंतर शाळेच्या विश्वस्तांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. तुषार आपटे या शाळेचे सचिव आहेत. त्यांनाच आता आरोपी तुषार आपटेला स्वीकृत नगरसेवकपद दिल्याने नवा वाद निर्माण झाला होता.
दरम्यान तुषार आपटे यांच्या नियुक्तीनंतर विरोधकांकडून टीकेची झोड उठली. त्यानंतर अवघ्या 24 तासात त्यांना नगरसेवक पदाचा राजीनामा द्यावा लागला. भाजपला ही उपरती आल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.