कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीची रंगत वाढली, भाजपचा उमेदवार ठरला, संध्याकाळी उमेदवाराची घोषणा…!
पुणे : पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सुरुवातीला बिनविरोध होईल अशी वाटणारी ही निवडणूक आताच किमान तिरंगी तरी होणार असल्याचे निश्चित झाले आहे.
आज भाजप- शिंदे गट यांची बैठक घेण्यात आली. बैठकीत कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठीच्या उमेदवारीसंदर्भात चर्चा झाली. दोन्ही मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवाराची नाव आज संध्याकाळपर्यंत जाहीर होतील, असे पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
यामुळे आता कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज रात्री उशिरा नावे जाहीर होतील. इच्छुक उमेदवारांच्या नावांची यादी तयार होत आहे. या दोन्ही जागांसाठी 6 तारखेला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी वेळ ठरवली आहे, असेही पाटील म्हणाले.
कसबा पेठमध्ये धीरज घाटे, गणेश बिडकर, हेमंत रासने हे या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. दरम्यान, निवडणूक बिनविरोध करण्यासाठी माधुरी मिसाळ यांनी सर्व पक्षांच्या अध्यक्षांना लेखी पत्र दिले आहे. त्यांनी निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी विनंती केली आहे.