BJP : भाजपला विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वात मोठा धक्का! माजी खासदाराने सोडला पक्ष, सगळ्या पदाचे दिले राजीनामे…
BJP : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यात अनेक नेतेमंडळींकडून पक्षप्रवेश केला जात आहे. असे असताना आता ऐन विधानसभा निवडणुकीत भाजपला मोठा धक्का बसला आहे.
भाजपा पक्षाच्या माजी खासदार आणि राष्ट्रीय प्रवक्त्या हिना गावित यांनी पक्षाला रामराम करून अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे.
हिना गावित यांचा निर्णय भाजपासाठी एक मोठा धक्का मानला जात आहे, विशेषत: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर. हिना गावित यांची नाराजी भाजपाच्या अंतर्गत मतभेदांवर आधारित असून, त्यांनी पक्षविरोधी कारवायांसाठी बंडखोरी केली आहे.
गावित यांच्या बंडखोरीचे मुख्य कारण म्हणजे अक्कलकुवा मतदारसंघात शिवसेनेच्या (शिंदे गट) उमेदवारीसाठी दिलेल्या संधीवर त्यांचा असंतोष. भाजपाच्या महायुतीत हा मतदारसंघ भाजपाला मिळावा अशी त्यांची अपेक्षा होती.
पण, यथावकाश तो मतदारसंघ शिवसेनेच्या (शिंदे गट) वाट्याला गेला आणि येथून आमश्या पाडवी यांना उमेदवारी देण्यात आली. यामुळे हिना गावित यांना अपमानित वाटले आणि त्यांनी त्यानंतर भाजपाला राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, हिना गावित यांनी असे म्हंटले की, मी दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले असून, पक्षाने माझ्या मतदारसंघात पुन्हा उमेदवारी दिली होती. परंतु, त्याच वेळी शिवसेनेच्या नेत्यांनी काँग्रेसचा खुलेआम प्रचार केला, ज्यामुळे माझा पराभव झाला. या पार्श्वभूमीवर, त्यांनी भाजपाला रामराम करत अक्कलकुवा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे.