पुण्यात कुख्यात गुंडाचं बर्थडे सेलिब्रेशन ; पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह, कारवाई होणार?

पुणे : गुन्हेगारी घटनांमुळे वारंवार चर्चेत आलेल्या पुणे शहरात एका पबच्या पार्किंगमध्ये कुख्यात गुंडाच्या बर्थडे सेलिब्रेशनमुळे खळबळ उडाली आहे. या पार्टीमध्ये अनेक कुख्यात गुन्हेगारांच्या उपस्थिती असल्यामुळे ही घटना चर्चेचा विषय बनली आहे. कुख्यात गुन्हेगार निखिल कांबळेचा वाढदिवस करण्यासाठी तब्बल 100 हून अधिक युवकांची गर्दी जमली होती. विशेष म्हणजे कांबळेवर येरवडा पोलीस ठाण्यात पोलीस कोठडीतून पळून जाण्याचा गंभीर गुन्हा दाखल असून काही दिवसापूर्वीच तो कारागृहातून सुटून बाहेर आला. त्याच्या बर्थडेच्या पार्टी दरम्यानच्या डीजेच्या प्रचंड आवाजामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ही पार्टी विमानतळ पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार फिरोज शेख याने आयोजित केली होती. विशेष म्हणजे, फिरोज शेखवर कलम 353 अंतर्गत गुन्हा नोंदवलेला आहे. आणि ज्या चौकातील पबमध्ये ही पार्टी झाली, त्याच परिसरात त्याने याआधी पोलिसांशी हुज्जत घालून अरेरावी केली होती. दरम्यान या सर्व प्रकारानंतरही पोलिसांनी अद्याप कोणतीही ठोस कारवाई न केल्यामुळे वाढती गुन्हेगारी आणि पोलिस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
दरम्यान कुख्यात गुंडाच्या या डीजे पार्टीमुळे विमाननगर परिसरात प्रचंड चर्चा सुरू असून सामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. आता पोलीस या प्रकरणात कारवाई करतील का? गुन्हा दाखल केला जाईल का? असे प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.