अब्जाधीश केशब महिंद्रा यांचे वयाच्या ९९व्या वर्षी निधन…!
मुंबई : भारतातील सर्वांत वयोवृद्ध अब्जाधीश आणि महिंद्रा अँड महिंद्राचे अध्यक्ष केशब महिंद्रा यांचे बुधवारी वयाच्या ९९व्या वर्षी निधन झाले आहे . महिंद्रा यांची एकूण संपत्ती १.२ अब्ज डॉलर होती.
त्यांच्या अध्यक्षपदाच्या ४८ वर्षांच्या कालावधीत, महिंद्रा समूहाचा विस्तार ऑटोमोबाईल उत्पादक ते आयटी, रिअल इस्टेट आणि वित्तीय सेवा यासारख्या इतर व्यवसाय विभागांमध्ये झाला. केशब महिंद्रा, महिंद्रा अँड महिंद्राचे अध्यक्ष होते, यूएसए, पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाचे ते पदवीधर होते. १९४७ मध्ये कंपनीत रुजू झाल्यानंतर १९६३ मध्ये ते चेअरमन झाले.
विलीज कॉर्पोरेशन, मित्सुबिशी, इंटरनॅशनल हार्वेस्टर, युनायटेड टेक्नॉलॉजीज, ब्रिटिश टेलिकॉम आणि इतर ब-याच मोठ्या कंपन्यांशी व्यावसायिक करार करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.महिंद्राच्या वेबसाईटनुसार केशब मंिहद्रा यांची केंद्रीय उद्योग सल्लागार परिषदेसह अनेक समित्यांवर काम करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली होती. २००४ ते २०१० पर्यंत ते पंतप्रधानांच्या व्यापार आणि उद्योग परिषदेचे, नवी दिल्लीचे सदस्य होते.त्यांनी सेल, टाटा स्टील, टाटा केमिकल्स, इंडियन हॉटेल्स, आयएफसी आणि आयसीआयसीआयसह विविध कंपन्यांच्या बोर्ड आणि कॉन्सिलवरही काम केले आहे. केशब महिंद्रा यांचा समावेश फोर्ब्स मासिकाने २०२३ च्या यादीत केला होता. ‘फोर्ब्स’ने सांगितले होते की, ते सर्वांत वयस्कर भारतीय अब्जाधीश आहेत.