आई कुलस्वामिनी तुळजाभवानीला आतापर्यंतचे सर्वात मोठे दान! दानपेटीत आढळले ‘एवढ्या’ कोटींचे हिरे
तुळजापूर : महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या तिजोरीतील सोने-चांदीचे गेल्या २ दिवसांपासून मोजमाप सुरू आहे. तब्बल १५ वर्षांनंतर भाविकांनी तुळजा भवानी देवीला अर्पण केलेल्या दागिन्यांचे मोजमाप सुरू आहे.
दरम्यान, या ऐवजाच्या मोजमापादरम्यान एक आश्चर्यकारक घटना घडली आहे, दागिन्यांचे मोजमाप सुरू असताना ३५४ हिरे भक्ताने दान केल्याचे समोर आले.
या ३५४ हिऱ्यांची किंमत अंदाजे ३० ते ४० कोटी असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु, इतक्या प्रमाणात हिरे एका भाविकाने दान केले की अनेक भाविकांनी याची माहिती अद्याप समोर आली नाही.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत बनलेल्या तुळजाभवानी मंदिरात दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे. कोरोना नंतर मंदिर उघडल्यानंतर राज्यभरातील भाविकांची या ठिकाणी गर्दी उसळली. अगदी कधीकधी व्हीआयपी पासेस देखील बंद करण्याची वेळ मंदिर व्यवस्थापनावर येते.
या मंदिरामध्ये आई तुळजाभवानीला नवस बोलणारे व नवसपूर्ती करणारे हजारो भाविक दररोज येतात. गेल्या पंधरा वर्षात तुळजाभवानी मंदिरामध्ये अर्पण केलेल्या दागिन्यांची मोजदाद झाली नव्हती.
शनिवारी ही मोजतात करत असताना त्यामध्ये एका सीलबंद पाकिटात तब्बल ३५४ हिरे दान करण्यात आल्याचे दिसून आले. हे हिरे आकाराने छोटे आहेत, मात्र त्यांची बाजारातील किंमत ३० ते ४० कोटी रुपये एवढी आहे.
आत्तापर्यंत तुळजाभवानीला अर्पण करण्यात आलेल्या दागिन्यांमध्ये सर्वात महागडी भेट ही या हिऱ्यांची असल्याचे सांगितले जात आहे. तुळजाभवानी देवीला नवसपूर्ती म्हणून अनेक भाविक सोने-चांदीच्या स्वरूपात दान अर्पण करतात. १५ वर्षानंतर सुरू करण्यात आलेली तिजोरीतील दान केलेल्या ऐवजाची मोजणी अजून महिनाभर चालणार आहे.
आगामी एक महिन्यात जवळपास २०० किलो सोने आणि ४ हजार किलो चांदीचे मोजमाप करण्यात येणार असल्याचा प्राथमिक अंदाज आहे, त्यानंतर त्यांची शुद्धता तपासणी होणार आहे.