बीड पोलीस दलात मोठी उलथापालथ, ६०० पोलिसांच्या तडकाफडकी बदल्या, नेमकं कारण काय?

बीड : बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणानंतर बीड पोलीस दलातील भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला होता. देशमुख यांचं अपहरण झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई करण्यास विलंब केला. त्यामुळे देशमुखांची हत्या झाली.
पोलिसांनी तत्काळ कारवाई केली असती तर अनर्थ टळला असता, असा आरोप देशमुख कुटुंबीयांकडून करण्यात आला. आरोपींना मदत केल्याप्रकरणी बीड पोलीस दलातील काही पोलिसांना यापूर्वीच निलंबित करण्यात आलं होते.
त्यानंतरही बीड पोलीस दलातील काही पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर विविध आरोप झाले. तसेच संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या जाव्यात, अशी मागणी देखील स्थानिक लोकप्रतिनिधींनी केली होती. त्या पार्श्वभूमीवर आता बीड पोलीस दलातील पोलीस कॉन्स्टेबल ते ग्रेड पोलीस उपनिरीक्षक अशा ६०० अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी याबाबतची प्रक्रिया पार पाडली असून आता येत्या महिनाभरात हे सर्व अधिकारी कर्मचारी आपल्या बदलीच्या ठिकाणी रुजू होतील.
संबंधित पोलीस अधिकारी आणि कर्मचारी मागील अनेक वर्षांपासून एकाच पोलीस ठाण्यात ठाण मांडून बसले होते. यातील काही पोलिसांचे स्थानिक गुन्हेगारांशी संबंध होते. त्यामुळे गुन्हेगारांची गुन्हे करण्याची हिंमत वाढली होती.