संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट ; मुंडेंच्या पत्रात खासदार अन स्वीय सचिवाचा उल्लेख, प्रकरणाला वेगळे वळण?

पुणे: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केल्यानंतर आता खळबळजनक खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणात आता मुंडे यांनी लिहिलेले आणखी एक पत्र समोर आले आहे. या पत्रात खासदार आणि त्यांच्या स्वीय सचिवाचा उल्लेख आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता आणखीन वेगळे वळण लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

डॉ. संपदा मुंडे यांनी आपल्या पत्रात संशयित आरोपीना फिटचे प्रमाणपत्र देण्यासाठी पोलिसांकडून दबाव असल्याचा आरोप केला. त्याला नकार दिल्यानंतर पोलिसांनी टॉर्चर करायला सुरुवात केली असल्याचे म्हटले आहे. त्याशिवाय, डीवायएसपी दर्जाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही पोलिसांवर कारवाई झाली नाही,असं त्यांनी त्यात म्हटल आहे.दरम्यान डॉ. मुंडे या काही दिवसांपासून वैद्यकीय तपासणीसंदर्भात पोलिसांशी झालेल्या वादामुळे सतत चौकशीला सामोऱ्या जात असल्याची माहिती समोर आली होती. याच चौकशी समितीला सादर करण्यात आलेले एक पत्र समोर आलं आहे.

गेल्या काही दिवसांपासून डॉ. संपदा मुंडे यांच्यावर पोलिसांचा, वैद्यकीय क्षेत्रातील काहींचा दबाव होता. त्यांचा मानसिक छळ सुरू करण्यात आला होता. बीडचे मुंडे कसे आहेत, कसे गुन्हे करतात असे म्हणत सतत हिणवले जात होते.चौकशी समितीला सविस्तर सांगूनही त्यांची दखल घेतली नाही. पोलीस निरीक्षक अनिल महाडीक यांचाही तक्रारीत उल्लेख आहे. त्याशिवाय, एकदा खासदारांनी फोन केला असल्याचे पत्रात म्हटले आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

दरम्यान खासदारांच्या पीएने वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी थेट खासदारांना फोन लावून दिला होता. त्यांनी देखील तुम्ही बीडचे असल्याने प्रमाणपत्र देत नाहीत, अशी पोलिसांची तक्रार असल्याचे म्हटले. त्यानंतर डॉ. संपदा मुंडे यांनी असे पुन्हा होणार नसल्याचे सांगितले होते..
संपदा मुंडे यांनी जूनमध्ये केलेल्या तक्रारीची दखल न घेतल्याने 13 ऑगस्ट रोजी त्यांनी पुन्हा माहिती अधिकार टाकून डीवायएसपी कार्यालयाकडून ऑफिसकडून माहिती मागवली. मात्र, तपासात कोणतेही सहकार्य होत नसल्याने आणि शारिरीक आणि मानसिक अत्याचार होत असल्याने डॉ. संपदा मुंडे यांनी अखेर टोकाचा निर्णय घेत आयुष्य संपवले.
