भिगवण अपहरण प्रकरणात मोठी अपडेट! तरुणी मध्यरात्री पोलीस ठाण्यात हजर, जबाबातून केला धक्कादायक उलगडा…

पुणे :पुणे जिल्ह्यातील भिगवण येथील तरुणीच्या अपहरण प्रकारणावरून वातावरण चांगलेच तापलं असताना या प्रकरणात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या अपहरणची केस भिगवण पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. मात्र आता ही मुलगी स्वतः बारामती पोलीस ठाण्यात हजर झाली असून तिने नोंदवलेल्या जबाबामुळे या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी पोलीस ठाण्यात हजर होताच अपहरणामागची सगळी स्टोरी तिने सांगितली आहे.माझी आई आणि माझ्या भावाने केलेली तक्रार खोटी असून त्यांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकण्यात आली नव्हती. शिवाय त्यांच्यावर काठीने हल्ला देखील करण्यात आला नाही, असा खुलासा संबंधित तरुणीने केला आहे. ज्या तरुणावर तिच्या अपहरणाचा आरोप आहे, तो तरुण मागील एक वर्षापासून तिच्या संपर्कात होता. दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. दोघांना एकमेकांशी लग्न करायचं होतं. असं तिने म्हटलं आहे.
तसेच त्या तरुणीने दोघांच्या प्रेम संबंधाबद्दल घरी सांगितले होते याच कारणामुळे तरुणीच्या घरच्यांनी तिचा विवाह अन्य एका तरुणाशी जुळवला होता. 22 फेब्रुवारी रोजी त्यांचा विवाह होणार होता. या लग्नाला तरुणीचा विरोध होता. तरीही घरच्यांनी तिच्या इच्छेविरोधात हा विवाह ठरवला होता. यामुळेच तरुणीने पळून जाण्याचा निर्णय घेतला. असे स्पष्ट सांगितले.

दरम्यान तिने आपला जबाब असा नोंदवला आहे की, तिचे अपहरण झाले नाही ती तिच्या मर्जीने मुलासोबत गेली होती.श्रीगोंदा, अहिल्यानगर,शिक्रापूर,पुणे, सासवड असा प्रवास करून ते महाबळेश्वरला गेले होते. दरम्यान आता स्वतःहून ती पोलिस ठाण्यात हजर झाली असता पोलिसांनी तिच्या कुटुंबीयांना पोलिस ठाण्यात बोलवले मात्र कुटुंबातील कोणतीही व्यक्ती पोलिस ठाण्यात आली नाही. तिच्या या जबाबामुळे प्रकरणाला आणखीन वेगळ वळण लागणार काय याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.