भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणी मोठा ट्विस्ट; मुलाची धक्कादायक कबुली, म्हणाला आमच्या घरी…

नाशिक : अध्यात्माच्या आडून महिलांचे लैंगिक शोषण आणि भाविकांची आर्थिक फसवणूक केल्याच्या आरोपांमुळे चर्चेत आलेल्या भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाला आता नवे आणि धक्कादायक वळण मिळाले आहे.

विशेष तपास पथकाने तपासाची कक्षा वाढवत अशोक खरात यांच्याभोवतीचा फास अधिक घट्ट केला आहे. दरम्यान, त्यांच्या मुलाने चौकशीत दिलेली महत्त्वपूर्ण कबुली या संपूर्ण प्रकरणातील निर्णायक दुवा ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या कबुलीनंतर अशोक खरात यांच्या घरात येणाऱ्या मोठ्या प्रमाणातील रोकड व्यवहारांवर आणि त्यामागील संभाव्य कनेक्शनवर पोलिसांचे लक्ष केंद्रीत झाले असून तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे.

SIT ने अशोक खरातच्या मुलाला ताब्यात घेऊन त्याची सखोल चौकशी केली. सुरुवातीला त्याने मौन बाळगले, मात्र सततच्या प्रश्नांच्या फैरीनंतर त्याने काही धक्कादायक बाबी उघड केल्याची माहिती समोर येत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, आमच्या घरी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम येत होती. मात्र हे पैसे नेमके कुठून आणि कसे येत होते, याची मला कोणतीही माहिती नव्हती. सर्व व्यवहारांवर डॅड अशोक खरात यांचेच पूर्ण नियंत्रण होते आणि प्रत्येक व्यवहाराची त्यांना सविस्तर माहिती होती, अशी कबुली त्याने दिल्याचे सांगितले जात आहे.
या खुलाशामुळे खरात यांच्या घरात मोठ्या प्रमाणात पैशांची आवक होत असल्याचे स्पष्ट झाले असून, त्यामागे एखादे मोठे रॅकेट कार्यरत असल्याचा संशय अधिक बळावला आहे.
मुलाने दिलेल्या माहितीनंतर पोलिसांचा संशय आता हवाला रॅकेटकडे वळला आहे. भक्तांकडून गोळा केलेला पैसा आणि इतर संशयास्पद मार्गाने मिळालेली संपत्ती पांढरी करण्यासाठी अशोक खरातने कोणते मार्ग अवलंबले, याचा सखोल तपास सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर ईशान्यश्वर मंदिराच्या शिवनिका संस्थानमधील तीन संचालकांना समोरासमोर बसवून चौकशी करण्यात आली. या चौकशीत अनेक आर्थिक विसंगती उघड झाल्याची माहिती समोर आली आहे.
संस्थांच्या नावाखाली चालणारे हे व्यवहार काळा पैसा लपवण्याचे माध्यम होते का, याचा आता तपास यंत्रणा बारकाईने शोध घेत आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.