राजकारणात मोठा ट्विस्ट! बारामतीत समीकरणं कोलमडली; सुनेत्रा पवारांचा विजय निश्चित?

बारामती : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार रिंगणात आहेत. त्यामुळे बारामतीची पोटनिवडणुक बिनविरोध व्हावी, अशी हालचाल सुरु आहे.

या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या विजयाच्या मार्गात उभा असलेला मोठा अडथळा दूर होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. काँग्रेस पक्षाने दिलेला उमेदवार माघार घेण्याची शक्यता निर्माण झाल्याने राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल घडू शकतो.
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या विरोधात काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी दिली होती. मात्र ही उमेदवारी मागे घेण्यासाठी सकाळपासून विविध पातळीवर चर्चा आणि प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर आली.

आमदार रोहित पवार यांनी सकाळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेऊन उमेदवारी मागे घेण्याची विनंती केली. या चर्चेमध्ये शरद पवार तसेच सुप्रिया सुळे यांनीही काँग्रेसने सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त केल्याचे सांगितले जाते.
या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला यांनी माध्यमांशी बोलताना महत्त्वाची माहिती दिली. त्यांनी सांगितले की बारामती पोटनिवडणुकीत आकाश मोरे यांची उमेदवारी मागे घेण्याचा निर्णय पक्षाकडून घेतला जाऊ शकतो.
जर हा निर्णय अधिकृतपणे जाहीर झाला, तर सुनेत्रा पवार यांच्या विजयाचा मार्ग अधिक सोपा होईल. तथापि ही निवडणूक पूर्णपणे बिनविरोध ठरणार नाही, कारण काही अपक्ष उमेदवार अजूनही निवडणूक रिंगणात कायम आहेत.