माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट! उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भरला उमेदवारी अर्ज…

बारामती : येथील माळेगाव कारखाना निवडणूक पार्श्वभूमीवर आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक घडामोडी घडल्या आहेत. आज २०० इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. या निवडणूक प्रक्रियेत एकूण ५९३ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
असे असताना या उमेदवारी यादीत खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘ब’ वर्ग संस्था मतदार संघातून आपली उमेदवारी जाहीर केल्याचे स्पष्ट झाले. यामुळे अजित पवार अर्ज ठेवणार की माघार घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पवार हे स्वतःच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पॅनेलमध्ये सहभागी होतात का? याचीच चर्चा आज सुरू होती.
असे झाल्यास पक्षाच्या पॅनेलला महत्व प्राप्त होणार असून अजित पवारांनी टाकलेला हा डाव असल्याचे सांगितले जात आहे. पवार यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून दत्तात्रेय येळे, तर अनुमोदक म्हणून सुनिल पवार यांच्या सह्या आहेत.
दरम्यान, येळे यांनीच पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यशवंत माने, गणेश शिंदे यांनी दिली. माळेगाव कारखाना निवडणूकीत ‘ब’ वर्ग मतदार संघातून खुद्द अजित पवार यांचीही उमेदवारी जाहीर झाल्याने चर्चेला सुरुवात झाली आहे.
बारामती खरेदी विक्री संघातून ते संस्था मतदार संघासाठी प्रतिनिधी म्हणून आले आहेत. सध्या सहा गटातून शेवटच्या दिवशी मंगळवारी दोनशे, तर एकूण ५९३ उमेदवारी अर्ज दाखल झाले. यामुळे आता उत्सुकता निर्माण झाली असून विरोधकांनी देखील जोरदार ताकद लावली आहे.