कंत्राटदार हर्षल पाटील आत्महत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट, मंत्री गुलाबराव पाटील यांचा धक्कादायक दावा..

पुणे : सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील युवा कॉन्ट्रॅक्टर हर्षल पाटील यांच्या आत्महत्येनंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. या घटनेने राज्यभरात खळबळ उडवली आहे. सरकारी कंत्राटांची बिले न मिळाल्याने आर्थिक अडचणींना कंटाळून त्याने जीवन संपवल्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.
अशातच आता जलसंपदा मंत्री गुलाबराव पाटील यांनी या प्रकरणावर थेट स्पष्टीकरण देत एक मोठा ट्विस्ट दिला आहे. त्यांच्या विधानामुळे प्रकरणाचा नवा पैलू समोर आला आहे.
गुलाबराव पाटील म्हणाले, हर्षल पाटील यांच्या नावावर जिल्हा परिषदेकडे कोणतीही नोंद नाही. त्यांनी सब-कॉन्ट्रॅक्टर म्हणून काम केलं असेल, पण त्याची अधिकृत नोंद नाही. त्याच्या नावावर जल जीवन मिशन योजनेतील कोणतीही थकित बिले नाहीत.
त्यामुळे सरकारकडून बिले न मिळाल्याने आत्महत्या केल्याचा दावा चुकीचा असल्याचा संकेत त्यांनी दिला. मात्र, त्यांच्या या वक्तव्यानंतर हर्षलच्या मृत्यूच्या कारणांबाबत अजूनही संभ्रम कायम आहे.
राज्यभरातून या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया उमटत असताना गुलाबराव पाटील म्हणाले, ही परिस्थिती केवळ महाराष्ट्रातच नाही, तर देशभरात आहे. आम्ही 3800 कोटींचा प्रस्ताव अर्थ व वित्त खात्याकडे दिला आहे. काही गोष्टींना वेळ लागतो, त्यामुळे संयम बाळगावा. सरकार आहे, कामं मागे पुढे होत असतात. पण बिनबुडाच्या आरोपांनी बवाल करू नये. यावरून सरकारकडून परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट होते.