मोठी बातमी! बारामतीच्या पोट निवडणुकीत मोठा ट्विस्ट, लक्ष्मण हाके यांची निवडणुकीतून अचानक माघार…

बारामती : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. ही निवडणूक बिनविरोध पार पडावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेससह महायुतीतील नेत्यांकडून प्रयत्न सुरू आहेत.

मात्र, तरीही काँग्रेसकडून ॲड. आकाश मोरे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. दुसरीकडे ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनीही निवडणूक लढवण्याची आक्रमक भूमिका घेतली होती.
दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघा काही वेळ शिल्लक असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्तात्रय भरणे यांनी लक्ष्मण हाके यांची भेट घेऊन त्यांना अर्ज मागे घेण्याची विनंती केली.

त्यानंतर दोन्ही नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत लक्ष्मण हाके यांनी आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा केली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विनंतीनंतर तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि इतर वरिष्ठ नेत्यांच्या आग्रहामुळे आपण हा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.