पुणे पोलीस दलात मोठी खळबळ!! वाघोलीत १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न, पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल…


पुणे : बनावट कागदपत्र तयार करून वाघोलीतील १० एकर जमिन बळकवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पुणे शहरातील तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांच्यासह चार जणांविरोधात चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह चौघांविरुद्ध फसवणूक, तसेच बनावट दस्त तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आनंद लालासाहेब भगत (केसवड वस्ती, वाडेगाव, ता. हवेली) याला चंदननगर पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने शुक्रवारी त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

भगत याच्यासह शैलेश सदाशिव ठोंबरे (रा. ससाणेनगर, हडपसर), चंदननगर पोलीस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सावरसिद्ध लांडगे आणि अर्चना पटेकर (रा. इस्लामपूर, सांगली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, २०२२ ते मे २०२३ दरम्यान हा प्रकार घडला. याबाबत चंदननगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक स्वाती खेडकर यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या जुन्या प्रकरणांचा निपटारा करताना ही बाब उघडकीस आली. या प्रकरणात चंदनगर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक लांडगे, त्यांचा मेव्हणा ठोंबरे, भगत आदी सामील असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे तपास करत आहेत.

पोलिसांनी आनंद भगत याच्या वाडेगाव येथील राहत्या घराची झडती घेतली. येथून पोलिसांनी वेगवेगळ्या नावाचे दस्तावेज, छायाप्रती, खरेदीखत, संमतीपत्रे, करारनामे, वीज देयक अशी कागदपत्रे जप्त केली. मूळ मालक असलेल्या महिलेच्या नावाने तयार करण्यात आलेली बनावट कागदपत्रे सापडली.

या प्रकरणाचा सखोल तपास करायचा असून, आराेपी भगतला पोलीस कोठडी देण्याची विनंती सरकारी वकील योगेश कदम यांनी न्यायालयाकडे दिली. न्यायालयाने भगतला २० मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

Views:

[jp_post_view]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!