काँग्रेसला मोठा धक्का ; राहुल गांधींच्या विश्वासू दिवंगत सहकाऱ्याची पत्नी भाजपात करणार प्रवेश, कोण आहेत आमदार प्रज्ञा सातव?

मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असताना आता राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच आता काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.दिवंगत काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या पत्नी आणि विधानपरिषदेच्या आमदार प्रज्ञा सातव भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

कोण आहेत डॉ. प्रज्ञा सातव?
गांधी घराण्याच्या अत्यंत जवळचे असलेल्या राजीव सातव यांना २०२१ मध्ये कोरोनाची लागण झाली होती. उपचार सुरू असतानाच आजारपणामुळे निधन झालं. प्रज्ञा सातव या महाराष्ट्र राज्य काँग्रेस समितीच्या उपाध्यक्ष आहेत. सध्या विधान परिषदेच्या आमदार आहेत. काँग्रेस नेते शरद रणपिसे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर २०२१ साली विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाली होती.

त्यानंतर २०२४ मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेसकडून दुसऱ्यांदा विधानपरिषदेवर निवडून आल्या. २०३० पर्यंत त्यांचा कार्यकाळ आहे. सातव कुटुंब हे काँग्रेसच्या विचारांचे घराणं समजलं जातं. मात्र, प्रज्ञा सातव या भाजपात प्रवेश करत असल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसणार आहे.या भाजप प्रवेशाआधीच त्या आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार असल्याची चर्चा होत आहे.
ऐन निवडणुकीच्या तोंडावर प्रज्ञा सातव यांचा पुढील काही दिवसांत संबंधित नेत्यासह कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर संबंधित नेत्याने आपल्या काही मोजक्या, विश्वासू कार्यकर्त्यांना तातडीने मुंबईत येण्याचे संदेश दिल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले आहे.