दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा धक्का, शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय…

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पूरस्थितीमुळे आधीच शैक्षणिक नुकसानीचा सामना करत असलेल्या विद्यार्थ्यांना आणि महागाईने त्रस्त असलेल्या पालकांना ऐन दिवाळीपूर्वी शुल्कवाढीचा फटका बसला आहे, ज्यामुळे पालकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
राज्य शिक्षण मंडळाने सलग चौथ्या वर्षी परीक्षा शुल्कात वाढ केली आहे, ज्यामुळे हा निर्णय म्हणजे एक प्रकारची परंपराच झाली आहे की काय, असा संतप्त सवाल पालक विचारत आहेत. पूरस्थिती आणि वाढत्या महागाईमुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या कुटुंबांवर, विशेषतः ग्रामीण भागातील शेतकरी पालकांवर या निर्णयाचा सर्वाधिक भार पडणार आहे.
मंडळाकडून केवळ परीक्षा शुल्कच नव्हे, तर प्रमाणपत्र, गुणपत्रिका लॅमिनेशन यांसारख्या विविध बाबींसाठी स्वतंत्रपणे शुल्क आकारले जात आहे. प्रशासकीय खर्च, ऑनलाइन अर्ज प्रक्रिया आणि परीक्षा आयोजनाच्या खर्चात वाढ झाल्याचे कारण मंडळाकडून या शुल्कवाढीसाठी दिले जात आहे. मात्र, या निर्णयामुळे मंडळाच्या धोरणावर सर्व स्तरांतून टीका होत आहे.
तसेच यावर्षी लागू झालेल्या नवीन दरानुसार, दहावीच्या विद्यार्थ्यांना ५२० रुपये तर बारावीच्या विद्यार्थ्यांना ५४० रुपये परीक्षा शुल्क म्हणून भरावे लागणार आहेत. ही केवळ मूळ परीक्षा फी असून याव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना अनेक अतिरिक्त शुल्कांचा भरणा करावा लागणार आहे.
दरम्यान, यामध्ये प्रशासकीय शुल्क २० रुपये, गुणपत्रिकेसाठी २० रुपये आणि प्रमाणपत्रासाठी २० रुपये यांचा समावेश आहे. त्याशिवाय, प्रति विषय प्रात्यक्षिक परीक्षेसाठी १५ रुपये, एमसीव्हीसी प्रात्यक्षिक परीक्षेसाठी प्रति विषय ३० रुपये आणि माहिती तंत्रज्ञान विषयासाठी तब्बल २०० रुपये अतिरिक्त शुल्क म्हणून आकारले जाणार आहे.