दिशा पटानीच्या घरावरील गोळीबार प्रकरणात मोठा खुलासा, ‘त्या’ हत्याकांडाशी जोडलं गेलं कनेक्शन…

मुंबई : अभिनेत्री दिशा पटानी हिच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतर सर्वत्र खळबळ माजली आहे. गोळीबाराप्रकरणी आता रोज नवीन अपडेट समोर येत आहेत. या घटनेनंतर रोज नवीन धक्कादायक माहिती समोर येत असून, आता या प्रकरणाचा धागा थेट हरियाणातील भिवानी कोर्टातील हत्याकांडाशी जोडला गेला आहे.

तसेच तपासात असे स्पष्ट झाले आहे की, दोन्ही घटनांची जबाबदारी एकाच फेसबुक आयडीवरून घेण्यात आली होती. हा आयडी पोर्तुगालमधून तयार केलेला असल्याचे पोलिसांना आढळले आहे.

भिवानी कोर्ट हत्याकांडामध्ये गँगस्टर हरी ऊर्फ हरियाच्या सहकऱ्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाची जबाबदारी रोहित गोदरा याच्या गुंडगिरी करणाऱ्या टोळीने स्वीकारली. आश्चर्याची बाब म्हणजे दिशा पटानीच्या घरावर झालेल्या गोळीबाराची जबाबदारीदेखील त्याच टोळीने घेतली आहे.

फेसबुकवरून जबाबदारी स्वीकारणाऱ्या अकाउंटवर ‘रोहित गोदरा गोल्डी ब्रार’ असे नाव होते. या आयडीवरून प्रथम भिवानी कोर्ट हत्येची कबुली देण्यात आली आणि त्यानंतर पटानीच्या घरावरच्या हल्ल्याची जबाबदारीदेखील घेतली गेली. धमकीचा ऑडिओ प्रसिद्ध झाल्यानंतर अकाउंट ताबडतोब बंद करण्यात आले.
बरेली आणि हरियाणा पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला आहे. दिशा पटानीच्या घरावरील गोळीबाराच्या तपासासाठी तब्बल सहा पथके तैनात करण्यात आली आहेत. टोळीतील अटक केलेल्या गुन्हेगारांकडून गेल्या दोन वर्षांतील घटनांचे व्हिडिओ, पुरावे गोळा केले जात आहेत.
दरम्यान, याशिवाय पोलिसांनी रात्री उघडी राहणारी दुकाने व त्यांच्या मालकांची यादी तयार केली आहे. दुकानदारांचे जबाब या प्रकरणातील महत्त्वाचे धागेदोरे ठरू शकतात, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
