शिधापत्रिका धारकांना मोठा दिलासा!! रेशन कार्ड ई केवायसीला पुन्हा मुदतवाढ, जाणून घ्या….

पुणे: सध्या जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांची अद्ययावत माहिती गोळा केली जात आहे. त्यासाठी ईकेवायसी अर्थात ग्राहकाची माहिती शिधापत्रिकेला जोडली जात आहे. त्यात आधार क्रमांक व हाताच्या बोटांचे ठसे घेतले जात आहेत. यामध्ये अनेकदा वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी निर्माण होत आहेत.
ही प्रक्रिया आपण ज्या रेशन दुकानातून धान्य घेतो, त्याच ठिकाणी दुकानदारामार्फत केली जात आहे. यातून बनावट शिधापत्रिकाधारकांना आळा बसणार आहे. आता शिधापत्रिका अद्ययावत करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे अनेकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी शिधापत्रिकेवरील सदस्यांची माहिती ग्राह्य धरली जाते. यासाठीची मुदत पूर्वी ३० नोव्हेंबर अशी होती. यासंदर्भात आता मुदतवाढ देण्यात आली आहे. अनेक अडचणींमुळे शिधापत्रिकांची ईकेवायसी रखडली होती.
त्यामुळे ही मुदत आता वाढविण्यात आली आहे. त्यामुळे सर्व शिधापत्रिकाधारकांनी आधार जोडणीसह हातांचे ठसे दुकानांमध्ये द्यावेत, असे आवाहन जिल्हा पुरवठा विभागाकडून करण्यात आली आहे. तसेच धान्य वितरणातील गळती रोखण्यासाठीही ईकेवायसी करण्यात येत आहे.
जिल्ह्यात शिधापत्रिकांमध्ये एकूण २६ लाख ६० हजार २२३ सदस्य आहेत. जिल्ह्यातील सर्व शिधापत्रिकांच्या किमान एका सदस्याचे १०० टक्के शिधापत्रिकांना आधार जोडणी करण्यात आली आहे. मात्र, सरकारच्या निर्देशांनुसार सर्व शिधापत्रिकाधारकांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे ईकेवायसी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
जिल्ह्यात १६ लाख ९३ हजार ५८२ सदस्यांचे ईकेवायसी पूर्ण करण्यात आले आहे. एकूण संख्येच्या हे प्रमाण ६३.६६ टक्के इतके आहे. त्यात सर्वाधिक ७३ टक्के ईकेवायसी शिरूर तालुक्यात पूर्ण करण्यात आले आहे. तर सर्वात कमी ४५ टक्के प्रमाण मुळशी तालुक्यात झाले आहे. यामुळे येणाऱ्या काळात संख्या वाढेल.