पूरग्रस्तांना मोठा दिलासा! ‘त्या’ कुटुंबांना मिळणार आर्थिक मदत, अजित पवारांची घोषणा…

पुणे : बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. या भीषण परिस्थितीची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल बीड जिल्ह्याचा दौरा केला. या अतिवृष्टीने शेती आणि घरांचे मोठे नुकसान झाले आहे.

अनेक ठिकाणी पूर आल्याने शेळ्या-मेंढ्या आणि वासरे वाहून गेली आहेत. अनेक रस्ते आणि पूलही पाण्याखाली गेल्याने दळणवळण पूर्णपणे ठप्प झाले आहे. आता या दौऱ्यादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केली.

अजित पवार म्हणाले की, ज्यांच्या घरात पाणी शिरले आहे त्यांना तातडीने आर्थिक मदत म्हणून ५ हजार रुपये देण्यात आले आहेत. याशिवाय प्रत्येक कुटुंबाला ५ किलो गहू आणि ५ किलो तांदूळ म्हणजे १० किलो धान्य पुरविण्यात आले आहे.

पाण्यामुळे धान्य भिजून खराब झाले असल्याने नागरिक अडचणीत आले आहेत. अशा परिस्थितीत प्रशासनाने त्यांना शाळा किंवा कार्यालयात तात्पुरता आसरा उपलब्ध करून दिला आहे.
अजित पवार यांनी सांगितले की, पूरग्रस्तांना वाचवण्यासाठी मिलिट्री, एनडीआरएफ टीम आणि स्थानिक प्रशासन यांनी एकत्रित काम केले. अनेक नागरिकांना एअरलिफ्ट करून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. जिल्हा प्रशासन आणि अधिकारी रात्रंदिवस मदतकार्यात गुंतले असून नागरिकांच्या तातडीच्या गरजा पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे.
मात्र, अजित पवारांनी मान्य केले की दिलेले १० किलो धान्य पूरग्रस्त कुटुंबांसाठी पुरेसे नाही. त्यामुळे अधिक अन्नधान्य आणि आवश्यक मदत कशी पुरवता येईल, यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान, या अतिवृष्टीग्रस्त भागांचा नुकताच मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि अजित पवार यांनी दौरा करून आढावा घेतला आहे. त्यानंतर राज्य सरकारने केंद्राला मदतीसाठी पत्र पाठवले आहे. काल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना परिस्थितीची माहिती देण्यात आली असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही मदतीचे पत्र पाठवले असल्याचे अजित पवारांनी स्पष्ट केले.
